पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी उद्या (दि.९) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. ( RG Kar hospital rape-murder case)
महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली होती. २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यास विलंब केल्याबद्दल कोलकाता पोलिसांवर कडक शब्दांमध्ये ताशेरे ओढले होते. तसेच देशातील न्यायदान आणि आरोग्यसेवा थांबवता येणार नाही, असे स्पष्ट करत डॉक्टरांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आवाहन केले होते. डॉक्टरांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दहा सदस्यीय राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देशही जारी केले होते.
या प्रकरणी केंद्र सरकारने नुकताच सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला. यामध्ये पश्चिम बंगाल सरकारने हॉस्पिटलमध्ये सुरक्षा पुरवण्याचे काम असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलास (CISF) सहाय्य प्रदान करण्यात असहकार केल्याचा आरोप केला आहे.आपल्या अर्जात, केंद्रीय गृह मंत्रालयाने तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारच्या कथित असहकारावर भाष्य केले आहे. संबंधित राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई करावी. केंद्राला पूर्ण सहकार्य करण्यासाठी राज्य प्राधिकरणांना निर्देश देण्याची मागणीही केली आहे.