Supreme Court file photo
राष्ट्रीय

Supreme Court | 'नावापुढून 'डॉक्टर' ही पदवी काढून टाका'; बलात्कार पीडितेवर उपचार नाकारणाऱ्या डॉक्टरवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे!

गाझियाबादमध्ये बलात्कार प्रकरणात मुलीवर उपचार करण्यात दिला होता डॉक्टरांनी नकार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली:  मार्च महिन्यात गाझियाबादमध्ये बलात्कार झालेल्या एका लहान मुलीवर वैद्यकीय उपचार नाकारणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी कडक शब्दांत ताशेरे ओढले. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. 

बलात्कार आणि हत्येची बळी ठरलेल्या त्या चार वर्षांच्या मुलीच्या वडिलांनी तपास आणि वैद्यकीय प्रतिसादातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधणारी याचिका दाखल केली होती.

"एक लहान मुलगी तुमच्यासमोर आणली गेली आणि तुम्ही इतके निर्दयी वागलात की तिला वैद्यकीय मदत दिली नाही. जर तुमच्यात थोडीही संवेदनशीलता असती, तर तुम्ही तिला स्वतःहून रुग्णालयात नेले असते," असे न्यायालयाने त्या डॉक्टरांना सुनावले. "जेव्हा आम्ही दंड ठोठावू, तेव्हा त्याचा मोठा परिणाम दिसून येईल. ती रक्कम पीडितेची भरपाई आणि कुटुंबाला मिळणारी वाजवी नुकसानभरपाई असेल. तुम्ही अत्यंत निष्ठुरपणे वागला आहात," असेही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नमूद केले.

यापूर्वी एप्रिल महिन्यातही सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दोन खासगी रुग्णालये आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर पूर्ण उदासीनता आणि असंवेदनशीलता असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

१६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत, मुलीच्या वडिलांच्या अनुपस्थितीत शेजारी राहणारा एक व्यक्ती चॉकलेट आणून देण्याचे आमिष दाखवून तिला घेऊन गेला होता. बराच वेळ उलटल्यानंतर शोध घेतला असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळली. दोन खासगी रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर अखेर गाझियाबाद जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT