Siddharth Shinde
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.
सोमवारी न्यायालयीन कामकाजादरम्यान त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आज (दि. १६) दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सिद्धार्थ शिंदे यांनी न्यायालयाचे क्लिष्ट भाषेतील निकाल तसेच गुंतागुंतीच्या कायद्याचे विश्लेषण सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगण्याची शैली आत्मसात केली होती. समाजातील सामान्य लोकांपर्यंत न्यायाची ओळख पोहोचवणे आणि कायद्याचे जनजागरण करणे हे त्यांचे ध्येय होते. यामुळेच महाराष्ट्रात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठा आरक्षणासह राज्यातील सत्तासंघर्ष यांसारख्या गाजलेल्या सुनावण्यांमधील युक्तिवाद जनतेपर्यंत पोहोचवण्यात ते अग्रभागी होते.