नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी नवी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायालयातील क्लिष्ट भाषेतील निकाल आणि प्रकरणे सोप्या भाषेत सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. 'पुढारी'च्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी कायद्याशी संबंधित मते मांडली आहेत.
सिद्धार्थ शिंदे सोमवारी दैनंदिन कामासाठी सर्वोच्च न्यायालयात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी वनतारा आणि वक्फ कायद्यासंबंधीच्या सुनावण्यांवर माध्यमांशी संवादही साधला. काही कालावधीनंतर त्यांना भोवळ आली आणि अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे तातडीने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर काही तास उपचारही झाले. मात्र सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालावली. मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटे त्यांचे पार्थिव विमानाने दिल्लीहून पुण्याला आणण्यात आले आणि दुपारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोण होते सिद्धार्थ शिंदे?
सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. सिद्धार्थ शिंदे गेली २ दशके सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. न्यायालयातील क्लिष्ट भाषेतील निकाल आणि प्रकरणे, कायद्यातील बारकावे सोप्या भाषेत सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष,आरक्षण विषयक प्रकरणे आणि इतरही अनेक महत्त्वांच्या विषयांवर ते माध्यमांना माहिती देत असत. महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींविषयी त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यांचे कायदेविषयक ज्ञान आणि न्यायालयीन भाषेच्या सोप्या शब्दात स्पष्टीकरण देण्यामुळे ते राज्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय होते. सुस्वभावी असलेल्या शिंदेंचा सर्व क्षेत्रात वावर होता. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गोतावळा नात्यांचा
खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे सिद्धार्थ शिंदेंच्या भगिनी आहेत. तर माजी आमदार चंदुकाका जगताप यांच्या कन्या सोनाली सिद्धार्थ शिंदेंच्या पत्नी आहेत. आमदार सत्यजित तांबे यांचे ते मामेभाऊ होते. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ शिंदे कामानिमित्त दिल्लीत स्थायिक झाले होते. शिंदे यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक झाले आहेत. सिद्धार्थ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील आणि मोठा परिवार आहे.
मान्यवरांच्या शोकसंवेदना
सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनावर राज्यातील मंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, अमर काळे, विशाल पाटील, शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदीत्य ठाकरे, माजी मंत्री आणि आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, आमदार सत्यजीत तांबे, माजी आमदार संजय जगताप आदी मान्यवरांसह कायदा, माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.