राष्ट्रीय

NEET-UG ग्रेस गुण रद्द : NTA ची सर्वोच्‍च न्‍यायालयात माहिती,1,563 उमेदवारांची पुनर्परीक्षा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : NEET-UG 2024मध्‍ये ग्रेस गुण देण्‍यात आलेल्‍या 1,563 पेक्षा अधिक उमेदवारांच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.  हे गुण परीक्षेदरम्यान वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्याच्या उद्देशाने दिले हाेते. आता या 1,563 उमेदवारांचे गुणपत्रक रद्द करण्‍यात आले आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज ( दि. १३) सर्वोच्च न्यायालयात दिली. दरम्‍यान, वैद्यकीय प्रवेशसाठीचे NEET-UG समुपदेशनाला स्थगिती देण्‍यात येणार नाही, असा पुनरुच्चार सर्वोच्‍च न्‍यायालयाने आजच्‍या सुनावणी वेळी केला.

सर्वोच्च न्यायालय आज NEET UG 2024 चाचणी रद्द करण्याची आणि ग्रेस गुणांच्या कथित विसंगतींमुळे पुनर्परीक्षा आयोजित करण्याची मागणी करणाऱ्या तीन याचिकांवरील  सुनावणी न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्‍या खंडपीठासमाेर झाली.

1,563 उमेदवारांची 23 जून रोजी पुनर्परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्‍या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास सांगितले की, "NEET-UG 2024मध्‍ये ग्रेस गुण देण्‍यात आलेल्‍या 1,563 पेक्षा अधिक उमेदवारांच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.  हे गुण परीक्षेदरम्यान वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्याच्या उद्देशाने दिले हाेते. आता या 1,563 उमेदवारांचे गुणपत्रक रद्द करण्‍यात आले आहे. यावर उपाय म्हणून या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याचा पर्याय दिला जाणार आहे. NTA ने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या निवेदनानुसार 23 जून रोजी पुनर्परीक्षा होणार आहे आणि निकाल 30 जूनपूर्वी जाहीर केला जाईल."

समुपदेशनाला स्थगिती देण्‍यात येणार नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाचा पुनरुच्चार

दरम्‍यान, वैद्यकीय प्रवेशसाठीचे NEET-UG समुपदेशनाला स्थगिती देण्‍यात येणार नाही, असा पुनरुच्चार सर्वोच्‍च न्‍यायालयाने आजच्‍या सुनावणी वेळी केला.

SCROLL FOR NEXT