नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : यूट्यूब पॉडकास्टमध्ये शालीनता राखेली जाईल, अशी हमी रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात आज (दि. १) दिली. इंडियाज गॉट लॅटेंट वाद प्रकरणी युट्यूबर अलाहबादियाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबादियावर परदेश प्रवास करण्यास निर्बंध घातले आहेत. ते निर्बंध उठवण्याची मागणी अलाहाबादियाच्या वकिलांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठाकडे केली. मात्र, न्यायालयाने परदेश प्रवासावरील निर्बंध हटवण्यास नकार दिला.
भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे) यांनी माहिती दिली की, अलाहबादिया यांच्याविरुद्धची चौकशी पूर्ण होण्यासाठी आणखी दोन आठवडे लागतील. यावर न्यायालयाने म्हटले की, परदेश प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी अलाहबादिया यांच्या याचिकेवर ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर विचार केला जाऊ शकतो.