राष्ट्रीय

NEET Exam : नीट फेरपरीक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांची २३ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले ग्रेस गुण रद्द करून त्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) घेतला होता. मात्र, या फेरपरीक्षेच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने फेरपरीक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे २३ जून रोजी या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे.

नीट गोंधळप्रकरणी हायकोर्ट सुनावणीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व गोंधळप्रकरणी देशातील विविध उच्च न्यायालयांत दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीला स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी (दि. 20) दिला आहे. तथापि, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनावर (काऊन्सेलिंग) स्थगिती देण्यास मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिला आहे.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेसह ४९ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एस.व्ही.एन भाटी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीची सीबीआय चौकशी करून ६२० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीसंदर्भात देशातील ७ उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेनेही (एनटीए) याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस बजावली होती.

खंडपीठाने नोटीस बजावल्यानंतरही उच्च न्यायालयांमध्ये नीटप्रकरणी सुनावणी सुरूच असल्याची बाब एनटीएचे वकील वर्धमान कौशिक यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. खंडपीठाने याबाबत दखल घेऊन राजस्थान, कोलकाता आणि मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती दिली.

'त्या' विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी

एनटीएने ग्रेस गुण दिलेल्या १५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा २३ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे एनटीएने न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र जारी करण्यात आले असून फेरपरीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाणार असल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली.

SCROLL FOR NEXT