Supreme Court | स्वतःच तारीख मागता आणि आम्ही निर्णय घेत नाही म्हणता Pudhari
राष्ट्रीय

Supreme Court | स्वतःच तारीख मागता आणि आम्ही निर्णय घेत नाही म्हणता

सुप्रीम कोर्टाने शिवसेना ठाकरे गटाला फटकारले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : जेव्हा प्रकरण सूचीबद्ध केले जाते, तेव्हा तुम्ही तारीख मागता आणि नंतर माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नसल्याची वक्तव्ये करता. हे सहन केले जाणार नाही. शब्दांचा वापर करताना सावधगिरी बाळगा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाला फटकारले.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून प्रकरण तातडीने ऐकून घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र, यावेळी माध्यमांमध्ये न्यायालयाबाबत होत असलेल्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचा इशारा दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.

3 वर्षे तारीख पे तारीख...

मागील 3 वर्षे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. दरवेळी तारीख पे तारीख असा सिलसिला सुरू आहे. दरवेळी सुनावणी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे वकील माध्यमांशी संवाद साधतात. दरम्यान, माध्यमांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाकडून ”न्यायालय निर्णय घेत नाही,” अशा प्रकारची वक्तव्य केली गेली, ही वक्तव्ये बेजबाबदार आहेत. असे मौखिक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आणि यापुढे असे होऊ नये, हे देखील बजावले.

न्यायालयात काय घडले?

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत ः तुमच्या नेत्यांनी शब्दांचा वापर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत : आम्ही गेली तीन वर्षे या सुनावणीची वाट पाहत आहोत. त्यामुळे आम्ही चिंतीत आहोत. या प्रकरणाला दोन ते तीन तास लागतील. वेळ ठरवून द्यावा, आम्ही ठरवलेल्या कालावधीत युक्तिवाद पूर्ण करू.

सरन्यायाधीश सूर्य कांत : आमची मुख्य चिंता ही माध्यमांमध्ये होणारी बेजबाबदार विधाने आहेत. आम्ही दररोज दुपारी 4 वाजेपर्यंत बसून काम करत आहोत. सर्व प्रकरणे एकाच दिवशी ऐकणे शक्य नसते.

शिंदे गटाचे वकील मुकुल रोहतगी : आम्हाला न्यायालयावरील कामाच्या ताणाची जाणीव आहे. कोणत्याही बाजूने अशा प्रकारची वक्तव्ये होता कामा नयेत. आमच्या बाजूने अशी वक्तव्ये झाली नाहीत. न्यायालय वेळ देईल तेव्हा आम्ही बाजू मांडू.

सरन्यायाधीश : तुम्ही न्यायालयात दाद मागता आणि नंतर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही, असे म्हणता. आम्ही अशा वर्तनाला प्रोत्साहन देणार नाही. दोन्ही बाजूंनी जबाबदारीने वागावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT