पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या मंजुरीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पत्नीने केलेल्या क्रूरतेच्या कारणावरून उच्च न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला होता. मात्र क्रूरतेचे कारण देत घटस्फोट मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांचे २००८ मध्ये विवाह झाला. दाम्पत्याला 2012 मध्ये एक मुलगाही झाला. मात्र काही वर्षानंतर पत्नीने आपल्या आई-वडिलांचा कधीही आदर केला नाही. ती सातत्याने त्यांचा छळ करत राहिली, अशी तक्रार करत कुणाल कपूर यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. मात्र त्यांच्या पत्नीने सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला. आपण नेहमीच पतीबरोबर एकनिष्ठ राहिला आहे. पती-पत्नीच्या नात्याच्या मर्यादेत राहून नेहमी संवाद साधला आहे. मात्र असे असतानाही त्यांनी आपल्याला अंधारात ठेवून घटस्फोट मिळवण्यासाठी खोटे आरोप केल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला नव्हता.
कुणाल कपूर यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, वस्तुस्थितीवरून असे दिसून आले आहे की पत्नीचे पती आणि त्याच्या पालकांशी वागणे चांगले नाही आणि यामुळे तिची प्रतिष्ठा खराब झाली आहे. जेव्हा पती-पत्नीपैकी एकाने दुसऱ्याशी असे वागले तेव्हा वैवाहिक नातेसंबंधाचे सार नष्ट होते. अशा परिस्थितीत त्यांना एकत्र राहण्यास भाग पाडणे तर्कसंगत नाही.उच्च न्यायालयाने त्यांना क्रूरतेच्या आधाराखाली घटस्फोट मंजूर केला होता.
कुणाल कपूर यांच्या पत्नीने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. क्रूरतेचे कारण देत घटस्फोट मिळणार नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने घटस्फोटाला स्थगिती दिली. तसेच खंडपीठाने न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याची शक्यता तपासण्यासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय मध्यस्थी केंद्राकडे पाठवले आहे.