Vantara
नवी दिल्ली : गुजरातमधील वनतारा वन्यजीव केंद्र आणि प्राणी अधिग्रहण प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली असून चौकशीचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. चेलमेश्वर करतील.
या SIT मध्ये उत्तराखंड आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राघवेंद्र चौहान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त हेमंत नागराळे आणि अनीश गुप्ता हे सदस्य असतील. न्यायमूर्ती पंकज मिथल आणि प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने अधिवक्ता सी. आर. जया सुकिन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.
गुजरातमधील जामनगर येथील वनतारा वन्यजीव केंद्र रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवले जाते. SIT ला इतर गोष्टींबरोबरच भारत आणि परदेशातून प्राण्यांच्या, विशेषतः हत्तींच्या अधिग्रहणात वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदी आणि इतर संबंधित कायद्यांचे पालन केले जात आहे की नाही, याची चौकशी करावी लागेल.
"आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अत्यंत आदराने स्वागत करतो. वनतारा पारदर्शकता, करुणा आणि कायद्याचे पूर्ण पालन करण्यास वचनबद्ध आहे. आमचे ध्येय आणि लक्ष प्राण्यांचे बचाव, पुनर्वसन आणि काळजी हेच राहील. आम्ही विशेष तपास पथकाला पूर्ण सहकार्य करू आणि आमचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवू, आमच्या सर्व प्रयत्नांच्या केंद्रस्थानी नेहमीच प्राण्यांचे कल्याण असेल. आम्ही विनंती करतो की ही प्रक्रिया कोणत्याही अनुमानाशिवाय आणि आम्ही ज्या प्राण्यांची सेवा करतो त्यांच्या हितासाठी होऊ द्यावी," असे निवेदनात म्हटले आहे.