नवी दिल्ली: शंभू सीमा खुली करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयाने पंजाब, हरियाणाच्या डीजीपींना शंभू सीमेवरील दोन्ही बाजूचे रस्ते अंशत: पुन्हा सुरू करण्यासाठी लगतच्या जिल्ह्यांच्या एसपींसोबत आठवड्याभरात बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदींसाठी महामार्ग खुला करण्यासाठी दोन्ही बाजूची एक-एक लेन सुरु करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाने सांगितले की, दोन्ही बाजूंनी प्रत्येकी एक लेन उघडली जाईल. तसेच, पंजाब आणि हरियाणाच्या पोलिस अधिकाऱ्यांना एका आठवड्यात या संदर्भात बैठक घेऊन कार्यपद्धती ठरवण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
शंभू सीमा प्रकरणातील वादावर शेतकऱ्यांसोबत तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हरियाणा सरकारने सहा तर पंजाबने एक नाव सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे. पंजाब सरकारने प्राध्यापक रणजित सिंह घुमान यांचा या समितीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे.