पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.२ सप्टें) जामीन मंजूर केला आहे. आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सर्वोच्च न्यायालयातील सुनाणी दरम्यान न्यायालयाने बिभव कुमार हे 100 दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आरोपपत्र आधीच दाखल करण्यात आले आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
बिभव कुमार यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ट्रायल कोर्ट तीन महिन्यांच्या आत महत्त्वाच्या आणि असुरक्षित साक्षीदारांची तपासणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. कुमार यांच्यावर काही अटी घातल्या आहेत की, त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित राजकीय कार्यालयाचे पीएस म्हणून बहाल केले जाणार नाही. सर्व साक्षीदार तपासले जात नाही तोपर्यंत कुमार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात प्रवेश करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्यावर आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. मेलवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या १३ मे रोजी सकाळी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या सरकारी निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावेळी बिभव कुमार आणि यांच्यात वाद झाला. यानंतर बिभव कुमार यांनी त्यांना मारहाण केली. 'छाती, पोट आणि ओटीपोटावर लाथ मारली. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्यासाठी विशेष तपास पथमाची ( एसआयटी )स्थापना करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी सीएम हाऊसमधून इतर कागदपत्रांसह डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केले होते आणि ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते.