Gangster Chhota Rajan : हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या गँगस्टर राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आज (दि. १७) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. ऑक्टोबर २०१५ मध्ये बाली (इंडोनेशिया) येथे अटक झाल्यानंतर छोटा राजनला भारतात आणण्यात आले होते. त्याच्यावर महाराष्ट्रात ७१ गुन्हे दाखल होते. हे सर्व गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.
सीबीआयच्या आव्हान याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीआयच्या वतीने युक्तीवाद करताता अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले, छोटा राजनला याआधीच चार प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. तो २७ वर्षे फरार होता याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. यावर “चार प्रकरणांमध्ये दोषी आणि २७ वर्षे फरार असलेल्या व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट का?” असा सवाल न्यायमूर्ती मेहता यांनी उपस्थित केला. छोटा राजनच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, या प्रकरणात त्याच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. सीबीआयने ७१ पैकी ४७ प्रकरणांमध्ये त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा न आढळल्यामुळे ती प्रकरणे बंद केली होती. मात्र, जेव्हा न्यायालयाने विशेषतः विचारले तेव्हा वकिलांनी मान्य केले की, ही छोटा राजनला खुनाच्या गुन्ह्यात झालेली दुसरी शिक्षा आहे. अखेर, न्यायालयाने वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य न धरता, छोटा राजनचा जामीन रद्द केला.
दक्षिण मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलचे मालक जय शेट्टी यांना छोटा राजनच्या टोळीकडून खंडणीची धमकी मिळत होती. हत्येच्या दोन महिने आधी शेट्टी यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. ४ मे २००१ रोजी, शेट्टी यांनी ५०,००० रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर, त्यांच्या कार्यालयाबाहेर टोळीच्या दोन सदस्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.मे २०२४ मध्ये, मुंबईतील विशेष मोक्का (MCOCA) न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. छोटा राजनला झालेली ही दुसरी जन्मठेपेची शिक्षा ठरली. यापूर्वी त्याला २०११ मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
२००१ साली झालेल्या हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात राजनने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२४ रोजी त्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देत जामीन मंजूर केला होता. मात्र, इतर अनेक प्रकरणात दोषी असल्यामुळे तो तुरुंगातून बाहेर आला नव्हता.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, छोटा राजन गेल्या २७ वर्षांपासून फरार होता. ज्या प्रकरणांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यामध्ये साक्षीदारांनी साक्ष दिली नाही म्हणून ती झाली आहे. सध्या तो इतर गुन्ह्यांखाली तुरुंगातच आहे. त्यामुळे जरी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला असला तरी, तो तुरुंगातून बाहेर येणार नाही.