Supreme Court | पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणांची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने बजावली केंद्रासह, निवडणूक आयोगाला नोटीस! Pudhari Photo
राष्ट्रीय

Supreme Court | पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणांची मागणी: सर्वोच्च न्यायालयाने बजावली केंद्रासह, निवडणूक आयोगाला नोटीस!

जनहित याचिकेची न्यायालयाकडून दखल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आमदार आणि खासदारांकडून राजीनाम्याचा वापर करून पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत होणारी अपात्रतेची कारवाई टाळण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भातील जनहित याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावली आहे. तसेच केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालय आणि संसदीय कार्य मंत्रालयालाही आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. ए. सेथू यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने आर. सतीश कुमार आणि जतीन यांनी बाजू मांडली.

राजीनाम्याद्वारे अपात्रता टाळण्याचा मुद्दा

पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीविरोधात अपात्रतेची याचिका दाखल झाल्यानंतर किंवा कारवाईची शक्यता निर्माण झाल्यानंतर संबंधित सदस्य राजीनामा देतात. त्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून पुन्हा निवडणूक लढवण्याचा मार्ग स्वीकारला जातो. अशा प्रकारे राजीनाम्याचा वापर करून अपात्रतेच्या कारवाईतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. यामुळे संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरबंदीच्या तरतुदींचा मूळ उद्देशच निष्प्रभ ठरू शकतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

राजीनामा दिला तरी अपात्रतेची प्रक्रिया सुरू राहावी

अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास ती प्रक्रिया आपोआप संपुष्टात येऊ नये, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राजीनामा स्वेच्छेने आणि खरोखरच दिला आहे की त्यामागे राजकीय दबाव अथवा अन्य हेतू आहे, याची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची व्यवस्था असावी. तसेच राजीनामा आणि अपात्रतेच्या याचिकांवर निश्चित कालमर्यादेत, पारदर्शक आणि कारणांसह निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींकडे असलेल्या सध्याच्या व्यवस्थेचे संस्थात्मक पुनरावलोकन करण्याची मागणीही याचिकेत आहे.

बहुमत चाचणीबाबतही स्पष्ट भूमिका

त्रिशंकू विधानसभेत सरकार स्थापनेचा दावा केवळ समर्थनपत्रे किंवा सभागृहाबाहेरील शक्तिप्रदर्शनाच्या आधारे मान्य करू नये, असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर विधिवत स्थापन झालेल्या सभागृहातच बहुमत चाचणी घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी संविधानाच्या अनुच्छेद १८८ चा संदर्भ देण्यात आला आहे. तसेच या याचिकेच्या माध्यमातून पक्षांतरबंदी कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी, राजीनाम्यांचा संभाव्य राजकीय गैरवापर आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेबाबत व्यापक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधी आयोग या मागण्यांवर काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT