राष्ट्रीय

NCP Finance Ministry Demand : राष्ट्रवादीला अर्थमंत्रिपद मिळावे अशी मागणी; मुख्यमंत्री सकारात्मक : सुनील तटकरे

"राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय अजेंड्यावर नाही"

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) अर्थमंत्रिपद मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या शिष्टमंडळाने केली असून मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय सध्या अजेंड्यावर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रिक्स संसदीय मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर पक्षाची भूमिका मांडली. जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत भारतीय लोकशाहीचे महत्त्व आणि संसदीय परंपरांची माहिती आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी संवाद साधला. या प्रतिनिधींना भारताची लोकशाही व्यवस्था समजून घेण्याची संधी मिळणे ही देशासाठी गौरवाची बाब असल्याचे तटकरे म्हणाले.

खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याचा तटकरेंनी तीव्र निषेध केला. "संसदीय लोकशाहीत मतभेद असू शकतात, मात्र वैयक्तिक पातळीवर टीका करणे योग्य नाही," असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे, गोगावले यांच्याशी उत्तम संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाद असल्याच्या चर्चांवरही तटकरेंनी स्पष्टीकरण दिले. "अलीकडच्या काळात आमच्यात कोणताही वाद झालेला नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीतही वादाचा प्रश्न नव्हता," असे त्यांनी स्पष्ट केले. दसऱ्याच्या आदल्या दिवशी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत भरत गोगावले यांच्याशी संवाद झाला होता; पालकमंत्री झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना मागील गोष्टी विसरून पुढे जावे, असे आपण सांगितल्याचे तटकरे म्हणाले. आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत समन्वयाने काम केले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही उत्तम संवाद असल्याचे त्यांनी नमूद केले. विकासकामांमध्ये शिंदे यांचे नेहमीच सहकार्य लाभल्याचेही ते म्हणाले.

विलीनीकरणाचा विषय अजेंड्यावर नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बोलताना तटकरे यांनी हा विषय पक्षाच्या अजेंड्यावर नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांच्या पक्षाची बैठक कशासाठी झाली होती, याबाबत त्या पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा कोणताही विषय सध्या चर्चेत नसल्याचे तटकरेंनी अधोरेखित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT