रशिया भारताला सुखोई (एसयू)-57 स्टेल्थ लढाऊ विमाने देण्यास तयार झाला आहे. या लढाऊ विमानांचे तंत्रज्ञानही कोणत्याही अटीशिवाय हस्तांतरित करतील, अशी माहिती रशियन कंपनी रॉस्टेकचे सीईओ सर्गेई चेमेझोव्ह यांनी दिली. रशियन एसयू-57 जेटस्ना अमेरिकेच्या ए-35 विमानांना टक्कर देणारे मानले जाते.
एसयू-57 प्रमाणेच ए-35 हे देखील पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आहे. अमेरिका बर्याच काळापासून भारताला एफ-35 विकण्यास इच्छुक आहे. रशियाकडून हे आश्वासन अशा वेळी आले आहे, जेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती.
एसयू-57 च्या तंत्रज्ञानावर कोणतेही बंधन असणार नाही. यामध्ये इंजिन, रडार, स्टेल्थ तंत्रज्ञान आणि आधुनिक शस्त्रास्त्रांची माहितीही दिली जाऊ शकते. जर भारताची इच्छा असेल, तर -57 चे उत्पादन भारतातच केले जाऊ शकते, असेही रशियाने म्हटले आहे. रशियाने भारताला दोन-आसनी (टू-सीटर) एसयू -57 तयार करण्याच्या संयुक्त योजनेचा प्रस्तावही दिला आहे.रशिया अनेक दशकांपासून भारताचा प्रमुख लष्करी पुरवठादार राहिला आहे. लढाऊ विमानांपासून पाणबुड्यांपर्यंत आणि क्षेपणास्त्र प्रणालींपासून हेलिकॉप्टरपर्यंत रशिया भारताला पुरवठा करत आला आहे.
भारत स्वतःच्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानावर काम करत आहे, ज्याचा प्रोटोटाइप (नमुना) 2-3 वर्षांत पूर्ण होईल. 2024 मध्ये सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने पाचव्या पिढीच्या स्वदेशी लढाऊ विमानाच्या डिझाईन आणि विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.
भारत आपल्या सध्याच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमसाठी रशियाकडून 10,000 कोटी रुपयांची क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी रशियन अधिकार्यांसोबत चर्चा सुरू आहे.