राष्ट्रीय

Student Shoots Classmate : चक्क शाळेत बंदूक नेली; वर्गमित्राला लागली गोळी : विद्यार्थ्याच्या आईवर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

केरळमधील त्रिताला परिसरातील सरकारी शाळेत खळबळ : जखमी विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर

पुढारी वृत्तसेवा

त्रिताला (केरळ) : शाळेत बंदूक घेऊन जाणे आणि खेळता-खेळता त्यातून सुटलेल्या गोळीने वर्गमित्र जखमी होणे, अशी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उत्तर केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील त्रितालाजवळ घडली.

याप्रकरणी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आईविरोधात पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असल्याने पालक म्हणून निष्काळजीपणा केल्याप्रकरणी आईवर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

त्रिताला पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली. संबंधित नववीतील विद्यार्थी आपल्यासोबत एक गावठी बनावटीची बंदूक घेऊन सरकारी शाळेत आला होता. वर्गामध्ये असताना तो या बंदुकीशी खेळत होता.

दरम्यान, अचानक बंदुकीचा चाप ओढला गेला आणि त्यातून गोळी सुटून बाजूलाच असलेल्या त्याच्या वर्गमित्राला लागली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार मंगळवारी रात्रीच याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला.

जखमी विद्यार्थ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

गोळी लागल्याने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून, सध्या त्याची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बंदुकीचा तपास, बाल न्याय मंडळासमोर हजेरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा विशेष पार्श्वभूमी अहवाल तयार करण्यात आला असून, त्याला लवकरच बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. बंदूक नेमकी कोठून आली, याचा तपास करताना मुलाने सांगितले की, ही बंदूक त्याच्या आईच्या कपाटात ठेवलेली होती. एफआयआरनुसार, ही गावठी बनावटीची बंदूक त्या मुलाच्या आजोबांची होती. ती कपाटातून काढून मुलाने शाळेत नेली होती. शस्त्रास्त्र तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत ही बंदूक गावठी बनावटीची असली, तरी ती पूर्णपणे कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT