मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका बारावीच्या विद्यार्थ्याने आपल्या माजी शाळेतील एका तरुण अतिथी शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारी घडली. 18 वर्षीय तरुण थेट 26 वर्षीय शिक्षिकेच्या घरात घुसला आणि शिक्षिकेला काही कळण्याच्या आतच अंगावर पेट्रोल ओतून लायटरने आग लावण्याचा प्रयत्न केला. या अचानक झालेल्या हल्ल्याने शिक्षिका प्रचंड घाबरली. या हल्ल्यात शिक्षिकेचे पाय सुमारे 20 टक्के भाजले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकतर्फी प्रेम आणि नकार पचवू न शकण्यारी तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याचे हे एक भीषण उदाहरण आहे. शाळेच्या आवाराबाहेरही शिक्षिका सुरक्षित नाहीत का, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे, या घटनेने शिक्षण क्षेत्रात आणि समाजात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.