झालवाड; वृत्तसंस्था : ज्या अंगणात दोन आनंदी मुलं बागडत होती. आज तेच अंगण मातेच्या आर्त आक्रोशाने गहिवरून गेलंय. हे वातावरण आहे राजस्थानच्या झालवाड जिल्ह्यातील पिपलोड गावातील घराचे. शुक्रवारी सकाळी एका सरकारी शाळेची इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 8 मुलांचा मृत्यू झाला. 28 हून अधिक मुले जखमी झाली आहेत. त्यात एकाच कुटुंबातील दोन सख्खी भावंडे मरण पावली.
या दुर्घटनेत आपली दोन्ही मुले गमावलेल्या एका आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ‘माझं सर्वस्व गेलं... मला दोनच मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. दोघेही गेले... माझं घर आता रिकामं झालं आहे. अंगणात खेळायला कोणीच नाही.... देवाने मला नेलं असतं आणि माझ्या मुलांना वाचवलं असतं तर बरं झालं असतं...’ हा तिचा हंबरडा उपस्थितांच्या काळजाचं पाणी करत होता. रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर जमलेल्या पालकांचा आक्रोश आणि किंकाळ्यांनी परिसर सुन्न झाला होता. शनिवारी पाच मुलांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर इतर दोघांवर स्वतंत्रपणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून, त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. एका पीडित मुलाच्या आईने प्रश्न उपस्थित केला की, घटनेच्या वेळी शिक्षक मुलांना वर्गात सोडून बाहेर काय करत होते?
10 लाखांची मदत : या दुर्घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने शाळेतील पाच कर्मचार्यांना निलंबित केले असून, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिक्षणमंत्र्यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी अजय सिंह यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.