नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय लष्कराने आपल्या जवानांसाठी सोशल मीडिया धोरणात सुधारणा केली असून, आता ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘एक्स’सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी अत्यंत कडक मार्गदर्शक तत्त्वांसह आणि अटींसह देण्यात आली आहे. ऑपरेशनल सिक्युरिटी (कार्यरत सुरक्षा) राखण्यासाठी जवानांना केवळ आशय पाहण्याची मुभा असून, पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
लष्करी गुप्तचर महासंचालनालयाने यासंबंधीचे निर्देश जारी केले असून, ते तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत. लष्करी जवान आता इन्स्टाग्राम केवळ पाहण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी वापरू शकतात. या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करणे, कमेंट करणे, शेअर करणे, रिअॅक्ट करणे किंवा मेसेज पाठवणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. यूट्यूब, एक्स, क्वोरा आणि इन्स्टाग्राम यावर केवळ पॅसिव्ह (निष्क्रिय) पद्धतीने माहिती मिळवण्यास परवानगी आहे.
मेसेजिंग अॅप्ससाठी नियम
स्काईप, टेलिग्राम, व्हॉटस्अॅप आणि सिग्नल यासारख्या अॅप्सचा वापर केवळ अवर्गीकृतआणि सामान्य माहिती देवाण-घेवाण करण्यासाठी करण्यास परवानगी आहे. असा संवाद केवळ ओळखीच्या व्यक्तींशीच केला जाऊ शकतो आणि समोरची व्यक्ती योग्य आहे की नाही, याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी वापरकर्त्यावर (जवानावर) असेल. जवानांना पायरेटेड सॉफ्टवेअर देणार्या वेबसाईट, फ्री मूव्ही प्लॅटफॉर्म, टॉरंट, व्हीपीएन सॉफ्टवेअर, वेब प्रॉक्सी आणि चॅट रुम्स वापरण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे.