नवी दिल्ली : येथील एअर फोर्स स्टेशनवर आयोजित गार्ड ऑफ ऑनर संचलन सोहळ्यात हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांचे स्वागत करताना भारतीय हवाई दलाचे अधिकारी.  (पीटीआय फोटो)
राष्ट्रीय

Air Chief Marshal Ashutosh Dixit | स्वदेशी लढाऊ विमाने, ड्रोनविरोधी यंत्रणेवर भर

हवाई दल युद्धसज्जता वाढविण्याला सर्वोच्च प्राधान्य; नवे हवाई दलप्रमुख दीक्षित यांची ‘वायू’ संकल्पना जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्‍था : चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणाऱ्या दुहेरी आव्हानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाची युद्धक्षमता वाढविणे आणि मंजूर संख्येपर्यंत लढाऊ विमानांची उपलब्धता पुन्हा नेणे, हे आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे नवे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अशुतोष दीक्षित यांनी रविवारी स्पष्ट केले. सध्या हवाई दलाकडे ४२.५ स्क्वॉड्रनची मंजूर क्षमता असताना प्रत्यक्षात केवळ २९ लढाऊ स्क्वॉड्रन कार्यरत आहेत.

हवाई दलप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयोजित मानवंदना समारंभात दीक्षित यांनी ‘वायू’ ही चार सूत्रांची संकल्पना मांडली. यामध्ये सज्जता, आत्मनिर्भरता, नवकल्पना आणि संयुक्त प्रयत्नांवर भर देण्यात आला आहे. प्रत्येक लढाऊ स्क्वॉड्रन, रडार, हवाई संरक्षण यंत्रणा आणि हवाई योद्धा अल्पावधीत कोणत्याही आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

‘वायू’मधील ‘ए’ म्हणजे आत्मनिर्भरता. तेजस एमके-१ए, एमके-२, पाचव्या पिढीतील प्रगत मध्यम लढाऊ विमान (एएमसीए), तसेच स्वदेशी सेन्सर आणि शस्त्रास्त्रांच्या विकासाला त्यांनी प्राधान्य दिले. विश्वासार्ह हवाई सामर्थ्याच्या बळावर संघर्ष रोखणे आणि गरज पडल्यास युद्ध जिंकणे, हे हवाई दलाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘वाय’ म्हणजे युक्ती. युद्धनीती, तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीत नवे बदल स्वीकारण्यावर यात भर आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नियंत्रण यंत्रणा, ड्रोनविरोधी संरक्षण कवच आणि अवकाशातील नव्या कार्यक्षेत्रांचा वापर यांचा त्यात समावेश आहे. ‘यू’ म्हणजे संयुक्त प्रयत्न. लष्कर, नौदल आणि अन्य राष्ट्रीय यंत्रणांशी समन्वय वाढविण्याचा हवाई दलाचा प्रयत्न असेल, असेही त्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT