मुंबई : अमेरिका आणि चीनमधील संघर्षामुळे जागतिक व्यापारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय तेल बाजार आणि चलनी बाजारावर मंगळवारी उमटले. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला असून, व्यापार अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या भावात घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरल्याने सेन्सेक्स 297 आणि निफ्टी निर्देशांक 81 अंकांनी खाली आला.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांक खाली आला. सेन्सेक्स 0.36 टक्क्यांनी घसरून 82,029 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 0.32 टक्क्यांनी घटून 25,145 अंकांवर विसावला. स्मॉल आणि मिडकॅप निर्देशांक 0.9 आणि 0.8 टक्क्यांनी खाली आला. त्यामुळे बीएसई-30 निर्देशांकाचे मोठे नुकसान झाले. बीएसईतील गुंतवणूकदारांनी तब्बल 3 लाख कोटी रुपये गमावले.
अमेरिका आणि चीनमधील संघर्ष वाढल्याने जागतिक व्यापाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. घसरणीनंतर सोमवारी कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढले होते. मात्र मंगळवारी कच्च्या तेलाचे भाव प्रतिबॅरल 1.01 डॉलर (1.6 टक्के) कोसळून 62.31 डॉलरवर आले. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडचे दर प्रतिबॅरल 95 सेंट्सने (1.6 टक्के) घटून 58.54 डॉलर प्रतिबॅरलवर आले. कच्च्या तेलाच्या भावातील हा गत पाच महिन्यांतील नीचांक ठरला आहे.
अमेरिका-चीनच्या संघर्षाचा दबाव मंगळवारच्या चलन बाजारातील सत्रात दिसून आला. रुपया नीचांकाचा उच्चांक गाठण्याची शक्यता होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) वेळीच हस्तक्षेप करीत डॉलरची विक्री केल्याने रुपयाची नीचांकी पडझड थांबली. मंगळवारी एका डॉलरचा भाव 88.79 रुपयांवर थांबला.