पुढारी ऑनलाईन डेस्क: HMPV Virus | मानवी मेटाप्न्यूमोव्हायरसचे (HMPV) भारतात ५ रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य आरोग्य सचिव, अधिकारी आणि युनिट्सची महत्त्वाची बैठक घेतली. ही बैठक आज (दि.७) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. दरम्यान, केंद्रीय सचिवांनी राज्यांनी श्वसनाच्या आजारावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिली आहेत. या संजर्भातील वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
HMPV चे भारतात रूग्ण आढळ्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर आहेत. केंद्र सरकारने राज्यांना ILI (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि SARI सह (तीव्र श्वसन संसर्ग) श्वसन आजारांवर देखरेख वाढवण्याचा आणि मानवी मेटाप्न्यूमोव्हायरसच्या (HMPV) प्रसाराला प्रतिबंध करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सोमवारी देशातील श्वसन आजार आणि HMPV प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह आज (दि.७) बैठक घेतली, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
बैठकीदरम्यान, आयडीएसपीच्या आकडेवारीवरून देशात कुठेही आयएलआय/एसएआरआय रुग्णांमध्ये असामान्य वाढ दिसून येत नाही, असा पुनरुच्चार करण्यात आला. आयसीएमआरच्या देखरेखीच्या आकडेवारीनेही याला दुजोरा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी यावर भर दिला की, २००१ पासून जागतिक स्तरावर उपस्थित असलेल्या एचएमपीव्हीमुळे जनतेसाठी चिंतेचे कोणतेही कारण नाही. त्यांनी राज्यांना आयएलआय/एसएआरआय देखरेख मजबूत करण्याचा आणि पुनरावलोकन करण्याचा सल्ला दिला.
मानवी मेटाप्न्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा अनेक श्वसन विषाणूंपैकी एक आहे. ज्याचा सर्व वयोगटातील लोकांना विशेषतः हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या महिन्यांत संसर्ग होऊ शकतो. विषाणूचा संसर्ग सामान्यतः सौम्य आणि स्वयं-मर्यादित स्थितीत असतो. त्यामुळे बहुतेक रुग्ण स्वतःहून बरे हाेत आहेत. आयसीएमआर-व्हीआरडीएल प्रयोगशाळांमध्ये पुरेशा निदान सुविधा उपलब्ध आहेत अशी माहिती देखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली. हिवाळ्याच्या महिन्यांत श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ दिसून येते, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या कोणत्याही संभाव्य वाढीसाठी देश सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी बैठकीदरम्यान राज्यांना साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे; डोळे, नाक किंवा तोंडाला न धुता स्पर्श करणे टाळणे; रोगाची लक्षणे असलेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळणे; खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकणे इत्यादी सोप्या उपायांसह विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांमध्ये आयईसी आणि जागरूकता वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या बैठकीत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल, आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV) आणि IDSP च्या राज्य देखरेख युनिट्सचे तज्ञ उपस्थित होते, असे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.