नवी दिल्ली : ऊस व कांदा उत्पादक शेतकरी प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठकीत गृह व सहकारमंत्री अमित शहा यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. 
राष्ट्रीय

साखर, कांदाप्रश्नी राज्यातील नेत्यांचे केंद्र सरकारला साकडे

सहकारमंत्री अमित शहा सकारात्मक : मुख्यमंत्री फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : साखरेच्या प्रश्नांवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बुधवारी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे अमित शहा यांनी मान्य केले आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदाप्रश्नी 10 दिवसांमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध नेत्यांनी दिली.

राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसंबंधी बुधवारी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकर्‍यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार या विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर सांगितले. या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी हेही या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पणनमंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. धनंजय महाडिक, आ. जयंत पाटील, डॉ. विनय कोरे, राहुल कुल, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर महासंघाचे जयप्रकाश दांडेगावकर, रणजितसिंह निंबाळकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT