नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट द्यावी, अशी विनंती प्रदेश काँग्रेसने शुक्रवारी केली. मणिपूर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कीशम मेघचंद्र सिंह यांच्यासमवेत राज्यातील इतर नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मणिपूरच्या जनतेच्यावतीने पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सिंह यांनी दिली.
मणिपूर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान कार्यालयाला भेट देऊन निवेदन सादर केले. मात्र, पंतप्रधान मोदी यांची भेट झाली नाही. मणिपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचारावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज्याच्या नेत्यांशी संवाद साधण्याचे आवाहन या निवेदनात कऱण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करण्यासाठी राष्ट्रीय राजधानीला रवाना झाले होते. मात्र, प्रशासनाने त्यांना निदर्शने करण्याची परवानगी नाकारली असल्याचे प्रदेशाध्यक्ष सिंह यांनी सांगितले. प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली असली, तरीही आमचा लढा सुरुच राहणार आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी मणिपूरला भेट द्यावी ही लोकांची ही एकमेव मागणी आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांची, अगदी भाजपचीही ही मागणी असल्याचे त्य़ांनी सांगितले.