Hathras Stampede
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगात घडलेल्या चेंगराचेंगरी 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला  Twitter
राष्ट्रीय

Hathras Stampede : कुंभमेळा ते हाथरस.. चेंगराचेंगरीमुळे ‘या’ ठिकाणी भविकांनी गमावला जीव

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावलेल्यांमध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना एटा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. भाविकांच्या चेंगराचेंगरीची ही पहिली घटना नाही. देशाच्या विविध भागांमध्ये अशा घटनेमुळे शेकडो लोकांना जीव गमवावा लागला आहे.

3 फेब्रुवारी 1954 : कुंभमेळ्यात 800 हून अधिक लोकांनी जीव गमावला

स्वतंत्र भारतात 1954 मध्ये पहिल्यांदा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कुंभमेळा अलाहाबाद (सध्याचे प्रयागराज) येथे झाला. मौनी अमावस्येच्या दिवशी मेळ्यात एक दुःखद घटना घडली. या कुंभमेळ्यात भीषण चेंगराचेंगरी झाली. ज्यात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 350 लोकांचा चिरडून मृत्यू झाला होता. 200 लोक बेपत्ता झाले होते. तर, 2000 हून अधिक लोक जखमी झाले.

25 जानेवारी 2005 : महाराष्ट्रातील मांढरदेवी मंदिरात चेंगराचेंगरी

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्याजवळ मांढरदेवीचे मंदिर एका डोंगरावर वसलेले आहे. याला काळुबाईचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान 340 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या दिवशीही जवळपास 3 लाख भक्त उत्सवासाठी जमले होते. यात मोठ्या संख्येने महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुले होती. दुपारच्यावेळी गर्दीत अचनाक गोंधळ उडाला. काही भाविक घसरून खाली पडले आणि गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते. या तंबूंनाही आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाला आणि शेकडोंचा बळी गेला आणि अनेकजण जखमी झाले.

2008 साली तीन मंदिरांमध्ये अपघात

30 सप्टेंबर 2008 : जोधपूर (राजस्थान) शहरातील चामुंडा देवी मंदिर

राजस्थानमधील जोधपूर शहरातील चामुंडा देवी मंदिरात बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पसरली. अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. ज्यामुळे भाविकांनी धावाधाव सुरू केली. यावेळे चेंगराचेंगरी झाली, ज्यात जवळपास 250 भाविकांचा मृत्यू झाला. 60 हून अधिक लोक जखमी झाले.

3 ऑगस्ट 2008 : हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिर

दरवर्षी श्रावण महिन्यात हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरात देवी मातेचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जमतात. 2008 सालीही देवीच्या दर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी पावसामुळे मंदिरात दरड कोसळल्याने लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत 146 जणांना जीव गमवावा लागला होता.

3 सप्टेंबर 2008 : राजस्थान चामुंडा देवी मंदिर

राजस्थानमधील चामुंडा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 224 जणांचा मृत्यू झाला. वास्तविक, शारदीय नवरात्रीमध्ये भाविकांची मोठी गर्दी केली होती. यावेळी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये झुंबड उडाली. त्यातच स्फोट झाल्याची अफवाही पसरली होती. ज्याचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाले आणि मोठी दुर्घटना घडली.

4 मार्च 2010 : उत्तर प्रदेशातील कृपालू महाराजांचे राम जानकी मंदिर

उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील कृपालू महाराजांच्या राम जानकी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 63 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मोफत कपडे आणि जेवण घेण्यासाठी लोक जमले होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश होता.

1 जानेवारी 2022 : वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी

नवीन वर्षाच्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 12 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले. भाविकांच्या काही गटांमध्ये देवीच्या दर्शनासाठी चढाओढ निर्माण झाली. यातून वादावादी झाली. त्याचे पर्यवसन धक्काबुक्की झाले. ज्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

21 एप्रिल 2019 : तामिळनाडूतील करुप्पासामी मंदिर

तामिळनाडूतील करुप्पासामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात जण ठार झाले. चित्रपौर्णिमेच्या रात्री मंदिरात पूजेसाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. यावेळी ही घटना घडली. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, पीएम मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि या घटनेतील जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली होती.

14 जानेवारी 2011 : पुलमेडू (केरळ) सबरीमाला मंदिर

मकर संक्रांतीच्या सणाला केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील पुलमेडू येथील सबरीमाला मंदिरात लाखो भाविक जमले होते. मकर संक्रांतीच्या दिवशीही याठिकाणी लोकांची मोठी गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली जीप गर्दीत शिरताना उलटली, त्यामुळे अनेकांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 109 जणांचा मृत्यू झाला.

2013 : दतिया (मध्य प्रदेश) येथील रतनगड माता मंदिर

2013 मध्ये मध्य प्रदेशातील दतिया येथील रतनगड माता मंदिरातही चेंगराचेंगरी झाली होती. शारदीय नवरात्रीच्या वेळी मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. ज्यात 115 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलांचा समावेश होता.

10 फेब्रुवारी 2013 : प्रयागराज जंक्शनमध्ये चेंगराचेंगरी

2013 सालीही प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली होती. 10 फेब्रुवारीला मौनी अमावस्या स्नान होते. स्नान करून दान केल्यानंतर भाविक आपापल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर पोहोचले होते. प्रयागराज जंक्शन (अलाहाबाद) येथे प्रचंड गर्दी झाली होती. सायंकाळी सात वाजता अचानक फलाट क्रमांक 6 कडे जाणाऱ्या फूट ओव्हरब्रिजच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले होते.

7 मार्च 2023 : मंदिराचा स्लॅब कोसळला

गेल्या वर्षी मार्चमध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिराचा स्लॅब कोसळला होता. ज्यामुळे मंदिरात उपस्थित भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. ज्यात 36 भाविकांचा मृत्यू झाला.

SCROLL FOR NEXT