नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यसभेत सभापती जगदीप धनकड यांनीही शरद पवारांना विशेष शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी केला.
पंतप्रधान मोदींनी समाज माध्यमांवरून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. 'शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभो,' अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. शरद पवारांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो. राज्याची, देशाची जी सेवा ते करत आहेत, ती त्यांनी करत राहावी, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राज्यसभेत शुभेच्छा देताना जगदीप धनकड म्हणाले की, शरद पवार देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आहेत. तसेच त्यांनी ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. त्यांनी देशाचे संरक्षण मंत्री, कृषीमंत्री म्हणूनही काम केले आहेत. राज्यसभेच्या सभागृहात ते दुसऱ्यांदा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते ७ वेळा लोकसभेवर निवडून आले. ६ वेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि एकदा विधानपरिषदेवरही निवडून आले, लोकसेवेसाठी आपल्या आयुष्याचा दीर्घकाळ त्यांनी दिला आहे. यावेळी राज्यसभा सभापती धनकड यांनी पोरांनी क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दलही भाष्य केले. मुंबई क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमधील त्यांच्या योगदानाचे सभापतींनी कौतुक केले. शरद पवारांशी गेल्या तीन दशकांपासून कौटुंबिक संबंध असल्याचेही जगदीप धनकड म्हणाले. दरम्यान, राज्यसभेत उपस्थित सदस्यांनी बाके वाजवून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, पक्षाचे सर्व ८ खासदार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश गजभिये, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, पक्षाच्या नेत्या भावना घाणेकर यांनीही शरद पवारांना भेटून शुभेच्छा दिल्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे यांनीही भेटून शुभेच्छा दिल्या. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या नेत्यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शरद पवारांना भेटून शुभेच्छा दिल्या.