पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी झामुआचे प्रमुख हेमंत सोरेन यांना सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. त्यामुळे सोरेन आजच झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री शपथविधीचा कार्यक्रम आज (दि.४जुलै) सायंकाळी ५ वाजता होणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणात झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची नुकतीच सुटका झाली आहे. ते सुमारे पाच महिने तुरुंगात होते. हेमंत सोरेनच्या अटकेनंतर झारखंडचे १२वे मुख्यमंत्री म्हणून २ फेब्रुवारी रोजी चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. बुधावार ३ जुलै रोजी चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
हेमंत सोरेन यांची 28 जून रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली. बुधवारी, राज्यातील झारखंड मुक्ति मोर्चा पक्षातील नेत्यांकडून त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केली. त्यानंतर त्यांनी झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. तप्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान नवी दिल्लीतील अधिकृत सूत्रांनी इंडिया टुडेला महत्त्वाची अपडेट दिली आहे. हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करणाऱ्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका अंमलबजावणी संचालनालय लवकरच सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.