नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात २ हजार कोटींच्या मालमत्तेची मालकी ५० लाख रुपयांत मिळवली, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात केला. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची (एजेएल) मालमत्ता २ हजार कोटी होती, असे ईडीचे म्हणणे आहे.
ईडीच्या वतीने न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, एजेएलकडे दिल्ली, लखनौ, भोपाळ, इंदूर, पंचकुला, पाटणा आणि इतर ठिकाणी मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ता केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी १९४७ नंतर वृत्तपत्र छपाई आणि प्रकाशनासाठी प्रदान केल्या आहेत. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर हे निवेदन सादर करण्यात आले. नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या फिर्यादी तक्रारीची दखल घ्यावी की नाही याबद्दल न्यायालय युक्तिवाद ऐकत आहे.
सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल राजू यांनी म्हटले की, गांधी कुटुंबाच्या जवळच्या सहकाऱ्यांना एजेएलचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पैसे वळवण्यासाठी फसवे व्यवहार करण्यात आले होते. या प्रकरणीची सुनावणी गुरुवारीही सुरू राहील.