Sonia Gandhi on Emergency : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey Of Love) हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या आत्मचरित्राच्या माध्यमातून त्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केले आहे. आता आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वी एका मुलाखतीत सोनिया गांधी यांनी आणीबाणीच्या निर्णयावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्याबाबत एक महत्त्वाचे भाष्य केले आहे.
दैनिक 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधींनी स्पष्ट केले की, लोक अनेकदा आणीबाणीसाठी संजय गांधी यांना जबाबदार धरतात, परंतु हे पूर्ण सत्य नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींवर त्यांच्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांचा प्रचंड दबाव होता.
"केवळ संजय गांधींनाच दोष देता येणार नाही. काही लोक अनेकदा आणीबाणीशी संजय गांधी यांचे नाव जोडतात. इंदिरा गांधींवर त्यांच्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांचा मोठा दबाव होता. मला वाटते की, त्यांच्या आसपास राजीव गांधींसारखी खूप कमी माणसे होती, ज्यांचा दृष्टिकोन वेगळा होता."
इंदिरा गांधींच्या दृष्टिकोनातून परिस्थिती स्पष्ट करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, तत्कालीन पंतप्रधान अत्यंत वेगाने बिघडत चाललेल्या परिस्थितीशी झुंज देत होत्या. यामध्ये हिंसक निदर्शने, सरकारी कार्यालयांवर आणि सार्वजनिक वाहतुकीवर झालेले हल्ले, सर्वत्र पसरलेली संघटित अशांतता, तसेच नोकरशाही आणि सशस्त्र दलांना आदेश न पाळण्याचे आवाहन करणे, अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. “मात्र, जेव्हा मी त्या काळाचा विचार करते आणि श्रीमती गांधींच्या दृष्टिकोनातून परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मला जाणवते की, त्या वेळी अत्यंत वेगाने बिघडत चाललेल्या परिस्थितीशी त्या झुंजत होत्या. हिंसक निदर्शने, सरकारी कार्यालयांना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लावलेली आग, सर्वत्र पसरलेली संघटित अशांतता, इतकेच नव्हे तर नोकरशाही आणि सशस्त्र दलांना आदेशांचे पालन न करण्याचे केलेले आवाहन, अशा कठीण प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागत होता,” असे त्या म्हणाल्या.
आणीबाणीला भारताच्या इतिहासातील लोकशाहीविरोधी आणि हुकूमशाही अध्याय मानले जावे का? या प्रश्नाला उत्तर देताना सोनिया गांधी म्हणाल्या, “आणीबाणीनंतरच मला त्या काळात घडलेल्या गोष्टींचे गांभीर्य समजले. आणीबाणीच्या काळात लोकशाही अधिकारांवर नक्कीच गदा आली होती. ‘हेबिअस कॉर्पस’ (Habeas Corpus - व्यक्तिस्वातंत्र्याशी संबंधित कायदेशीर अधिकार) स्थगित करण्यात आले होते, परंतु हे सर्व घटनात्मक चौकटीत राहूनच केले गेले होते.”
"आणीबाणीच्या काळात घेतलेल्या निर्णयांबद्दल इंदिरा गांधींना पश्चात्ताप झाला होता. भूतकाळातील घटनांकडे मागे वळून पाहिल्यास गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजतात. आपण हे विसरता कामा नये की, इंदिरा गांधींनी स्वतःच परिस्थिती ओळखली होती. यानंतर त्यांनी मार्च १९७७ मध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय, तुम्हाला माहीतच आहे की, आणीबाणीच्या काळात घेतलेल्या कठोर निर्णयांबद्दल त्यांनी नंतर जाहीरपणे माफीही मागितली होती," असेही सोनिया गांधी यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांचे कौतुक केले. त्यांनी आज (दि. ७) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर ही मुलाखत शेअर करत लिहिले, “सार्वजनिक जीवनातील साठ वर्षे, तरीही त्या आजही तशाच आहेत. मला तुमचा अभिमान वाटतो, आई.”