राष्ट्रीय

Sonia Gandhi Book big Mistakes : सोनिया गांधींच्या पुस्तकात चुकांचा भडिमार! RSS स्थापना ते अण्णांच्या आंदोलनाचे वर्षच बदलले

Sonia Gandhi book Belonging Controversy : सोनिया गांधींच्या पुस्तकातील घोडचुकांमुळे 'फॅक्ट-चेकिंग'चा बोजवारा, सोशल मीडियावर चिरफाड

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे बहुचर्चित 'बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक अखेर प्रकाशित झाले आहे. एकूण ५४४ पानांच्या या विस्तृत पुस्तकात सोनिया गांधी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे, संस्मरणीय अनुभव आणि राजकीय घडामोडींचा पट उलगडला आहे. मात्र, पुस्तक बाजारात दाखल होताच त्यातील काही ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण नोंदींवरून नवा वाद उफाळून आला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या पुस्तकातील कथित तथ्यात्मक चुकांचे स्क्रीनशॉट आणि पानांची छायाचित्रे शेअर करत सोनिया गांधी यांच्या दाव्यांवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

अण्णा हजारेंचे जनआंदोलन ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपर्यंत, अनेक ऐतिहासिक घटनांच्या नोंदींवरून सध्या हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 'फॅक्ट्स' (Facts) नावाच्या एका 'एक्स' युझरने पुस्तकातील काही पानांचे फोटो प्रसिद्ध करत त्यातील तीन ठळक आणि गंभीर चुका चव्हाट्यावर आणल्या आहेत. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही तासांतच सजग वाचकांनी या तथ्यात्मक विसंगती अचूकपणे पकडल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या पुस्तकात नमूद करण्यात आलेली पहिली मोठी चूक म्हणजे अण्णा हजारेंचे आंदोलन. पुस्तकात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशात गाजलेले भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन २०१२ मध्ये झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र प्रत्यक्षात हे ऐतिहासिक आंदोलन २०११ मध्ये उभे राहिले होते. यानंतर दुसरी मोठी चूक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेबाबत आढळली आहे. सोनिया गांधी यांच्या या पुस्तकात संघाची स्थापना १९२१ मध्ये झाल्याचे म्हटले गेले आहे, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना प्रत्यक्षात १९२५ मध्ये द्स-याच्या मुहुर्तावर झाली होती. याव्यतिरिक्त, तिसरी गंभीर चूक काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते दिवंगत अहमद पटेल यांच्या निधनाच्या वर्षाबाबत निदर्शनास आली आहे. पुस्तकात अहमद पटेल यांचे निधन २०२२ मध्ये झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, कोविड-१९ च्या संसर्गामुळे २५ नोव्हेंबर २०२० रोजीच त्यांचे दुःखद निधन झाले होते.

पुस्तकातील या कथित तथ्यात्मक चुका उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रियांचा महापूर आला असून नेटकऱ्यांनी संमिश्र सूर लावला आहे. काही युझर्सनी सोनिया गांधी यांच्यावर सडकून टीका करत त्यांना ट्रोल केले आहे, तर काही काँग्रेस समर्थकांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र नावाच्या एका युझरने उपरोधिक टोला लगावत, 'असो, ही तर एक काल्पनिक साहित्यकृतीच आहे,' अशी टिप्पणी केली आहे. तर सात्विक नावाच्या आणखी एका युझरने यावर अधिक तिरकस भाष्य करत, 'मला खात्री आहे की हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा (AI) वापर केला असावा आणि म्हणूनच एआयने या काल्पनिक गोष्टी पुस्तकात घुसवल्या असाव्यात,' असा दावा केला आहे.

केवळ नेटकरीच नव्हे, तर प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या पुस्तकाच्या फॅक्ट-चेकिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'बुक पब्लिशिंग कोच' नावाच्या एका युझरने यासंदर्भात अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. त्यानुसार, 'पेंग्विन' हे नामांकित प्रकाशन गृह या पुस्तकाची सखोल आणि सर्वंकष तथ्य पडताळणी करण्यास इच्छुक होते; परंतु सोनिया गांधी यांनी त्याला स्पष्ट नकार दर्शवला. परिणामी, पेंग्विनने या पुस्तकाच्या प्रकाशनातून माघार घेतली. त्यानंतर 'हार्परकॉलिन्स' या प्रकाशनाने यात व्यावसायिक संधी शोधत अतिशय मर्यादित पडताळणीच्या आधारे हे पुस्तक घाईघाईने बाजारात आणले, असा आरोपही आता या निमित्ताने केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT