Sonia Gandhi’s book Launch : गांधी कुटुंबीयांच्या हस्ते सोनिया गांधींच्या ‘बिलॉंगिंग’ पुस्तकाचे प्रकाशन!  
राष्ट्रीय

Sonia Gandhi’s book Launch : गांधी कुटुंबीयांच्या हस्ते सोनिया गांधींच्या ‘बिलॉंगिंग’ पुस्तकाचे प्रकाशन! 

अमरिंदर सिंग, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. विजय जोसेफ यांची लक्षवेधी उपस्थिती 

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते सोनिया गांधी यांच्या बिलॉंगिंग या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा राजधानी दिल्लीत पार पडला. देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, सोनिया गांधींच्या पुस्तकाचे प्रकाशन स्वतः सोनिया गांधी, त्यांचे पुत्र आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, त्यांच्या कन्या आणि खासदार प्रियंका गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रकाशन नंतर सोनिया गांधींची एक प्रकट मुलाखत झाली. या प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी पुस्तकाविषयी आणि राजीव गांधी सोबत त्यांची भेट ते काँग्रेसमधील प्रवास, सद्य परिस्थितीवरही भाष्य केले. 

सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित?

सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची मुले दुसऱ्या रांगेत बसली होती. या कार्यक्रमाला पहिल्या रांगेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. विजय जोसेफ, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, खा. सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खा. अखिलेश यादव, खा. डिंपल यादव, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर, जम्मू कश्मीरमधील नेत्या मेहबूबा मुफ्ती, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार बसल्या होत्या.

तर उपस्थित नेत्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, केरळमचे मुख्यमंत्री सतीशन, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, अंबिका सोनी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, सचिन पायलट, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, गौरव गोगोई, अजय राय, अधीर रंजन चौधरी आदी नेते उपस्थित होते. 

सी. विजय जोसेफ, अमरिंदर सिंग यांची लक्षवेधी उपस्थिती 

सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. विजय जोसेफ देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या शेजारी ते बसले होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग देखील बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसशी संबंधित कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चा देखील गेले काही दिवस सुरू आहेत.

सोनिया गांधींचे जीवनपट उलगडणारी चित्रफित

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुस्तक प्रकाशनानंतर सोनिया गांधींचे जीवनपट उलगडणारी एक चित्रफित दाखवण्यात आली. यामध्ये सोनिया गांधी भारतात दाखल झाल्या, त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास, प्रचारसभा, पक्षातील घडामोडी यामधील काही खास बाबी दाखवण्यात आल्या. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT