नवी दिल्ली : बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमावरून सुरू असलेल्या वादादरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर (भाजप) 'मतचोरी'चा आरोप केला आहे. या आरोपांना भाजपने आज जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
या मुद्द्यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'एक्स' प्लॅटफॉर्मवरून टीका केली, तर दुसरीकडे लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक विस्तृत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तेजस्वी यादव यांच्यापासून ते ममता बॅनर्जींपर्यंतच्या आरोपांनाही उत्तर दिले.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘जेव्हा बनावट मतांची साफसफाई करण्यासाठी आणि खऱ्या नागरिकांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) मोहीम राबविण्यात आली, तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यालाही विरोध केला.’
काँग्रेसवर गंभीर आरोप करताना ठाकूर म्हणाले, ‘‘काँग्रेसला भारतातील मतदारांना कमी का लेखायचे आहे? भारतातील मतदारांनी काँग्रेसला वारंवार नाकारल्यामुळे आता काँग्रेसला केवळ आपल्या घुसखोरांच्या व्होट बँकेपुरते मर्यादित राहायचे आहे का?’’
खासदार ठाकूर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘‘पराभव यांचा होतो आणि आरोप निवडणूक आयोग (ECI) आणि भाजपवर केले जातात. धूळ त्यांच्या चेहऱ्यावर होती आणि ते आरसा साफ करत राहिले. निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी संविधानाबद्दल संभ्रम पसरवला आणि आता पुन्हा खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे निवडणुकीसाठी कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही.’’
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, ‘‘इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मतदार हे मूर्खांचा समूह आहेत. जेव्हा राजीव गांधी निवडणूक हरले, तेव्हा त्यांनी मतपत्रिकांना दोष दिला. राहुल गांधी यांचे वडील म्हणायचे की मतदान यंत्रांद्वारे (EVM) निवडणुका घ्या आणि आता राहुल गांधी म्हणतात की मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्या. हे लोक केवळ इतरांवर आरोपच करत राहतात. त्यामुळे आता परिवारानेच ठरवावे की कोणाला ठेवायचे आणि कोणाला नाही.’’
अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘‘मागील बिहार निवडणूक हरल्यानंतर काँग्रेसने विरोधी पक्षांसोबत मिळून खोटे आरोप करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस म्हणते की भाजपसाठी ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आली. त्यानंतर ते म्हणतात की ईव्हीएमवर बंदी घालून मतपत्रिका परत आणाव्यात. नंतर ते असाही दावा करतात की ईव्हीएम रिमोटने हॅक केले जाऊ शकते. प्रत्येक पराभवानंतर आत्मचिंतन करण्याऐवजी काँग्रेस ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि संवैधानिक संस्थांना दोष देत राहते,’’ असेही ते म्हणाले.
अनुराग ठाकूर यांनी काही उदाहरणे देत म्हटले की, ‘‘रायबरेलीमध्ये मोहम्मद कैफ खान यांचे नाव बूथ क्रमांक ८३, १५१ आणि २१८ अशा सर्व ठिकाणी आहे. घर क्रमांक १८९ च्या मतदान केंद्र १३१ वर ४७ मतदार ओळखपत्रे नोंदवली गेली आहेत. बंगालच्या डायमंड हार्बरमधील घर क्रमांक ००११, बूथ क्रमांक १०३ वर विविध धर्मांचे मतदार नोंदणीकृत आहेत." ते पुढे म्हणाले, "रायबरेलीत एकाच घराच्या पत्त्यावर ४७ मतदार कसे नोंदवले गेले, हे राहुलजी आणि सोनियाजी यांना कधी दिसले नाही का?’’
भाजप आयटी सेलचे प्रमुख आणि बंगाल भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी 'एक्स'वरील एका पोस्टद्वारे आरोप केला आहे की, सोनिया गांधी यांचे नाव १९८० आणि १९८३ मध्ये दोन वेळा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, जबकि दोन्ही वेळेस त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नव्हते. अमित मालवीय यांच्या मते, हे संपूर्ण प्रकरण निवडणूक कायद्याच्या स्पष्ट उल्लंघनाचे उदाहरण आहे आणि कदाचित याच कारणामुळे राहुल गांधी अपात्र किंवा अवैध मतदारांना कायदेशीर ठरविण्याच्या बाजूने आहेत आणि 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) ला विरोध करत आहेत.
अमित मालवीय यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘‘सोनिया गांधी यांचे नाव प्रथम १९८० मध्ये मतदार यादीत नोंदवले गेले, तेव्हा त्या इटलीच्या नागरिक होत्या आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेले नव्हते. त्यावेळी गांधी परिवार पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या १, सफदरजंग रोड येथे राहत वास्तव्यास होते.’’