Sonam Wangchuk
नवी दिल्ली: 'नीट' पेपरफुटीनंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आज पाहाटे रुग्णालयात हलवले आहे. त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर, जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळावरून आंदोलकांना हटवले जात असल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
त्याच वेळी, 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनाही ताब्यात घेण्यात आले. "दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आणि ताब्यात घेतले आहे," अशी पोस्ट दिपके यांनी 'एक्स'वर केली आहे.
नीट सारख्या प्रमुख परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी वांगचुक २८ जूनपासून उपोषणावर होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, न्यायालयाचे आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन, प्रकृती खालावल्यामुळे वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
विशेष म्हणजे, सोनम वांगचुक यांची सुरक्षा आणि आरोग्य यांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवर सुनावणी झाली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्देश दिले होते की, त्यांची सरकारी डॉक्टरांकडून नियमित तपासणी व्हावी आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे आवश्यक पावले उचलली जावीत; तसेच प्रत्येक मानवी जीव मौल्यवान असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले होते.
प्रकृती सतत खालावत असूनही, वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री एक व्हिडिओ संदेश जारी केला, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांचे शरीराचे वजन सुमारे २० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यांनी नमूद केले की त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाला आहे, तरीही त्यांचे मनोधैर्य आणि मानसिक स्थिती खंबीर आहे. वांगचुक यांनी नागरिकांना २० जुलै रोजी नियोजित असलेल्या 'चलो संसद' आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते.