Sonam Wangchuk discharged  Pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk discharged : "आधी राजघाट, मग पुन्हा पर्वतांकडे...": सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांसह संपूर्ण कर्मचाऱ्यांचे मानले विशेष आभार

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk discharged : दीर्घकालीन उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने गुरगावच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज (दि. २७)डिस्चार्ज देण्यात आला. सुमारे आठवडाभर ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर वांगचुक लडाखला परतण्यापूर्वी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करणार आहेत.

सोनम वांगचुक यांना डिस्चार्ज

मेदांता रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, "२१ जुलै २०२६ रोजी दाखल झालेल्या सोनम वांगचुक यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर 'इंटरनल मेडिसिन' आणि 'क्रिटिकल केअर' तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सर्व वैद्यकीय घटक (व्हायटल्स) सामान्य आहेत. त्यांना नियमित तपासणीसाठी ओपीडीमध्ये येण्याचा सल्ला देण्यात आला आहे."

'मेदांता'मधील डॉक्टरांसह संपूर्ण कर्मचाऱ्यांचे मानले आभार

डिस्चार्ज मिळाल्यानंतर भावना व्यक्त करताना वांगचुक यांनी शेअर केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये म्‍हटलं आहे की, "आणि अखेरीस मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी राजघाटावर जाईन आणि त्यानंतर पुन्हा डोंगराळ भागात परत जाईन.तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, आणि गुरगावच्या मेदांता रुग्णालयातील डॉक्टर व संपूर्ण कर्मचाऱ्यांचे विशेष धन्यवाद!"

२६ दिवस उपोषण, वजन १० किलोपेक्षा अधिक घटले

NEET-UG पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाचे नेतृत्व सोनम वांगचुक यांनी केले होते. सलग २६ दिवस चाललेल्या या उपोषणामुळे ते देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. या २६ दिवसांच्या उपोषणात वांगचुक यांचे वजन १० किलोपेक्षा जास्त घटले आहे. दरम्‍यान, कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे शिष्टमंडळ आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेच्या फेऱ्यांनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नरेंद्र मोदी सरकारने ज्येष्ठ भाजप नेते प्रल्हाद जोशी यांची नवे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT