राष्ट्रीय

Sonam Raghuwanshi Case : सोनम रघुवंशीच्या जामिनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी पत्नी सोनम रघुवंशी हिला मेघालय उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. 

उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत काही आक्षेप असल्याचे न्यायालयाने नमूद केले. मात्र, जामिनाच्या अटींची पूर्तता करून सोनम रघुवंशीची तुरुंगातून सुटका झाली असून ती सध्या शिलाँगमध्ये असल्याने जामिनाच्या आदेशाला तत्काळ स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.

मेघालय सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडताना, सोनम रघुवंशीवरील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगितले. केवळ तांत्रिक कारणांच्या आधारे तिला जामीन देता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला.

दरम्यान, मेघालयात २०२५ मध्ये हनिमूनदरम्यान पतीच्या हत्येप्रकरणी सोनम रघुवंशीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मेघालय उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. त्या आदेशाला आव्हान देण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणावरील पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार असून, जामिनाच्या वैधतेबाबत अंतिम निर्णय त्यानंतर घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT