जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथील करधनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. येथे WiFi कनेक्शनवरून झालेल्या वादातून ३१ वर्षीय नवीन सिंहने त्याची आई संतोष (५१) हिचा रागाच्या भरात गळा दाबून आणि डोक्यावर लाकडी दांडक्याने घाव घालून खून केला. गंभीर जखमी झालेल्या संतोष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सध्या दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले आरोपीचे वडील लक्ष्मण सिंह यांनी आपल्या मुलाला फाशी देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘एकुलता एक मुलगा असूनही त्याने आईची हत्या करून कुटुंबाला उद्ध्वस्त केले आहे. त्याला फाशी द्या, आमचा त्याच्याशी आता काहीही संबंध नाही.’ लक्ष्मण सिंह यांनी असेही सांगितले की, ‘नवीन हा अनेक वर्षांपासून व्यसनाधीन होता आणि बहुतेक वेळ आपल्या खोलीतच स्वत:ला एकटा बंद करून बसायचा. त्याच्या या वागण्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून मी त्याच्याशी बोलणेही बंद केले होते.’
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात मुलीचे लग्न होणार होते, मात्र या घटनेमुळे आनंदाच्या क्षणांवर शोककळा पसरली आहे. आता लग्न कसे होणार? असा प्रश्न संपूर्ण कुटुंबाला सतावत आहे, असे वडिलांनी सांगितले.
नवीन सिंह बीए उत्तीर्ण होता. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. सध्या तो बेरोजगार होता. त्यातच तो व्यसनाधीनतेमुळे कुटुंबाशी वारंवार भांडण करत असे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक पथकाच्या (FSL) मदतीने पुरावे गोळा केले. हत्येसाठी वापरलेला लाकडी दांडकाही जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.