डाळिंब बागेचे संग्रहित छायाचित्र. 
राष्ट्रीय

सोलापूरचे डाळिंब समुद्रामार्गे पोहोचले ऑस्ट्रेलियात

Pomegranate export : ताज्या फळांच्या निर्यातीत सातत्याने वाढ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामध्ये येऊ लागली आहे. सोलापूरहून निर्यात झालेले डाळिंब गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात पोहोचले. या डाळिंबाला ऑस्ट्रेलियामध्ये मोठी मागणी आहे. सोलापूरमधून ५.७ मेट्रिक टन डाळिंब निर्यात झाल्याचे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) सांगितले. गेल्या महिन्यात हे डाळींब ऑस्ट्रेलियात पोहोचले. ही निर्यात समुद्री मार्गाने करण्यात आली. भारतीय ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे.

एपीडानुसार, अ‍ॅग्रोस्टार आणि के. बी. एक्सपोर्ट्सच्या सहकार्याने भारतातील प्रीमियम सांगोला आणि भगव्या डाळिंबाची पहिली व्यावसायिक चाचणी शिपमेंट समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियाला यशस्वीरित्या पूर्ण केली. भारतीय ताज्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने हे एक मोठे यश आहे. पहिली समुद्री मालवाहतूक ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतातून निघाली आणि १३ जानेवारी २०२५ रोजी सिडनीला पोहोचली. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सोलापूर भागातून आणलेले ५.७ मेट्रिक टन डाळिंब १,९०० पेट्यांमध्ये पॅक केले गेले. प्रत्येक पेटीमध्ये ३ किलो प्रीमियम फळे होती. ६ जानेवारी २०२५ रोजी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे १,८७२ पेट्या (६.५६ टन) भगव्या वाणाची आणखी एक व्यावसायिक समुद्री वाहतूक पोहोचली. मोठ्या प्रमाणात समुद्री शिपमेंटच्या वापरामुळे स्पर्धात्मक किंमत सुनिश्चित झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आणि शाश्वत व्यवसाय संधी निर्माण झाल्या.

ऑस्ट्रेलियात भारतीय डाळींबाच्या निर्यातीसाठी फेब्रुवारी २०२४ मध्ये कृती आराखडा आणि मानक कार्यप्रणालीवर स्वाक्षरी करण्यात आली. यानंतर, जुलै २०२४ मध्ये पहिली हवाई खेप पाठवण्यात आली. पुढे वाढती मागणी आणि कमी खर्चामुळे, समुद्री मार्ग वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

एपीडाचे अध्यक्ष अभिषेक देव म्हणाले की, भारताचा कृषी निर्यात क्षेत्र अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. ताज्या फळांच्या निर्यातीत वर्षानुवर्षे २९ टक्क्यांनी वाढ होत आहे. केवळ डाळिंबात २० टक्के वाढ झाली आहे, जी या क्षेत्राची अफाट क्षमता दर्शवते. ऑस्ट्रेलियात प्रीमियम डाळिंबांची यशस्वी वाहतूक ही भारताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च दर्जाचे ताजे उत्पादन पुरवण्याची क्षमता दर्शवते. एपीडा ही भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे जी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न निर्यात सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT