अनिल साक्षी
जम्मू : जम्मू जिल्ह्यात सोशल मीडियाच्या गैरवापरावर लगाम घालण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राकेश मिन्हास यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, भडकावू, सांप्रदायिक आणि दिशाभूल करणारा कंटेंट पोस्ट, शेअर किंवा प्रसारित करण्यावर पुढील 60 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत जारी केला असून, सार्वजनिक शांतता आणि सांप्रदायिक ऐक्य राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाच्या मते, अलीकडील काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून खोट्या, उत्तेजक आणि सांप्रदायिक भावना भडकावणार्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर पसरवल्या जात आहेत. यामुळे कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या आदेशानुसार, जात-धर्म या आधारावर भेदभाव, द्वेष, तणाव निर्माण करणार्या पोस्ट करणे, फॉरवर्ड करणे पूर्णतः प्रतिबंधित आहे. याशिवाय फेक न्यूज, मॉर्फ फोटो-व्हिडीओ, अफवा यांचाही प्रसार करण्यास मनाई केली आहे. जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियाद्वारे बहिष्काराचे आवाहन करणे, धमक्या देणे, हिंसाचार भडकावणे, बेकायदेशीर सभा आयोजित करणे किंवा धार्मिक भावना दुखावणारी सामग्री प्रसारित करणे यावरही कडक बंदी असेल.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी कोणताही भडकावू किंवा संशयास्पद कंटेंट पुढे न पाठवता तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर क्राईम युनिटकडे कळवावी. तसेच, सोशल मीडिया ग्रुपचे अॅडमिन आणि मॉडरेटर यांनाही इशारा देण्यात आला आहे की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून अशा प्रकारची सामग्री प्रसारित झाल्यास त्यांनाही जबाबदार धरले जाईल.