नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
केदारनाथ-बद्रीनाथपासून शिमलापर्यंत उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या शहरांमध्ये मोसमातली पहिली बर्फवृष्टी पहायला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी निसर्गाचे मनमाेहक दृष्य निर्माण झाले आहे.
पर्वती प्रदेशात सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली दिसून येत आहे. रस्त्यापासून झाडे, वेली, घरे अशा सर्वांवर पांढऱ्या शुभ्र बर्फाचे अच्छादन निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी मनमोहक दृष्य निर्माण झालेय.
केदारनाथ मध्येही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. ज्यामुळे केदारनाथ मंदिर पांढऱ्या शुभ्र बर्फांने वेढल्याचे सुंदर चित्र दिसत आहे. पर्वती आणि डोंगराळ प्रदेशातील बर्फवृष्टीचे चित्र येत्या काही दिवसात मैदानी भागातही दिसून येईल. वातावरणातील थंडीची तीव्रता वाढण्यासोबतच पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.
चमोली, औली, बद्रीनाथ, जोशीमठसह उंचावरील पर्वतरांगा मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीने न्हाउन निघाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकही आनंदीत आहेत. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात तुफान बर्फवृष्टी तर मैदानी प्रदेशात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी २ ते ४ इंचापर्यंत बर्फाची चादर पसरलेली दिसून येत आहे.
केदारनाथ धाममध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने या ठिकाणची सर्व कार्य तुर्तास बंद करण्यात आली आहेत. उंचावरील ठिकाणी होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी प्रदेशात थंड वारे वाहू लागल्याने कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.
हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शितलहर येण्याची शक्यता वर्तवली आहे. हिमाचलमध्ये झालेल्या मोठ्या बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. गाड्यांवरही बर्फाचा थर साचला आहे. गंगोत्री धाममध्येही बर्फवृष्टीमुळे बर्फाचा मोठा थर निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
शिमलामध्येही मोसमातील पहिल्या बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. या दरम्यान २ ते ३ डिग्रीने तापमानात घट झाल्याचे दिसून आले.