Palaash Muchhal
सांगली : क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्याशी लग्न मोडल्यामुळे चर्चेत असलेला गायक पलाश मुच्छाल याने सांगलीतील एका व्यक्तीची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बुधवारी संध्याकाळी सांगली जिल्हा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचा बालपणीचा मित्र आणि पेशाने चित्रपट फायनान्सर असलेल्या वैभव माने याची ओळख पलाश मुच्छाल सांगली दौऱ्यावर असताना स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांनी करून दिली होती. माने यांनी आपल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, मुच्छालने एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडून पैसे घेतले होते, मात्र तो प्रकल्प पूर्ण न झाल्याने त्याने पैसे परत केले नाहीत. माने यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारीसोबत आवश्यक कागदपत्रे आणि व्यवहाराचा तपशील सादर केला आहे.
वैभव माने यांचा असा दावा आहे की, पलाश मुच्छालने त्यांना 'नजरिया' नावाच्या चित्रपटात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा चित्रपट लवकरच एका ओटीटी
प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल आणि गुंतवलेले पैसे लवकर परत मिळतील, असे आश्वासन माने यांना देण्यात आले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून माने यांनी चित्रपट निर्मितीसाठी एकूण ४० लाख रुपये गुंतवले. त्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात आणि गुगल पे द्वारे विविध हप्त्यांमध्ये दिली असून त्याचे पुरावेही पोलिसांना दिले आहेत.
तक्रारदाराचा आरोप आहे की, हा चित्रपट कधीच पूर्ण झाला नाही. जेव्हा त्यांनी आपले पैसे परत मागितले, तेव्हा मुच्छालने सुरुवातीला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र नंतर तो टाळाटाळ करू लागला आणि अखेरीस त्याने माने यांचा नंबर ब्लॉक केला.
अनेक महिने वाट पाहिल्यानंतर, वैभव माने यांनी सांगली पोलिसांत धाव घेत आर्थिक फसवणुकीची औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना तक्रार प्राप्त झाली असून तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्याशी लग्न मोडल्यामुळे पलाश मुच्छाल चर्चेत आहे. या प्रकरणानंतर काही आठवड्यांनी तो पुन्हा कामावर परतला असून, सध्या तो एका नवीन चित्रपटाच्या दिग्दर्शनाची तयारी करत आहे, ज्यात अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत असणार आहे.