नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सामान्य माणसाच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या डाळींच्या किमतीत मे महिन्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन डाळींचा साठा करणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कंझ्युमर अफेअर विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये तुरीच्या डाळीची सरासरी किंमत 116.68 रुपये होती. आता 18 मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही किंमत वाढून 118.98 रुपये झाली आहे.
मे महिन्याच्या अखेरीस या किमती 120 रुपयांचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाले तर मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसेल. कारण, त्यांचा महिन्याचा खर्च हा ठरलेला असतो. त्यामुळे महागाईमुळे त्यांचा हा खर्च बिघडण्याची शक्यता आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, मे महिन्यात केवळ तूरडाळीच्या किमतीत वाढ नाही झाली असे नव्हे, तर मूगडाळ, उडीद डाळ आणि चणाडाळीच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे. मूगडाळीच्या किमतीविषयी सांगायचे, तर 18 मे दरम्यान या किमतीमध्ये 107.29 रुपये ते 108.41 अशी वाढ झाली आहे. उडीद डाळीच्या किमतीत 108.23 रुपये ते 109.44 रुपये वाढ झाली आहे. चणाडाळीच्या किमतीत 73.71 रुपये ते 74.23 रुपये वाढ झाली आहे.
डाळींच्या वाढत्या किमतींमुळे सरकारदेखील चिंतेत आहे. डाळींच्या वाढत्या किमती पाहता केंद्र सरकारकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, कोणीही एका महिन्यापेक्षा जास्त काळ डाळींचा साठा करून ठेवू शकत नाही. कोणी असे केले, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच डाळींच्या आयातीवरही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. खरे तर भारतात सुमारे 70 टक्के तूरडाळ आयात केली जाते.