पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचे आयटी हब असलेल्या बंगळुरू शहरात आता ड्रोनद्वारे डिलिव्हरी सेवा देण्यात येत आहे. हायपरलोकल ड्रोन डिलिव्हरी नेटवर्क असलेल्या स्काय एअर (Skye Air) या कंपनीने केवळ 7 मिनिटांत ड्रोनद्वारे डिलिव्हरी देण्याची ही सेवा बंगळुरूमध्ये सुरू केली आहे.
या सेवेमुळे गुरुग्रामनंतर भारतातील ड्रोन लॉजिस्टिक्सचा स्वीकार करणारे बंगळुरू हे देशातील दुसरे शहर ठरले आहे. ही नवीन सेवा ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स क्षेत्रात मोठा बदल घडवून आणेल, असा दावा कंपनीने केला आहे. (Skye Air introduces 7-minute drone delivery service in Bengaluru)
बंगळूरूमधील कोनानकुंटे आणि कणकपुरा रोड परिसरातील रहिवाशांना केवळ 7 मिनिटांत ड्रोनद्वारे डिलिव्हरी मिळणार आहे. शहरी लॉजिस्टिक्समध्ये होत असलेल्या तांत्रिक प्रगतीचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
10 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता
कंपनीच्या मते, ही देशव्यापी बदलाची सुरुवात आहे. आगामी काळातड्रोन डिलिव्हरी एक सामान्य गोष्ट होईल. ही सेवा स्काय शिप वन या फ्लॅगशिप डिलिव्हरी ड्रोनच्या सहकार्याने सुरू आहे. हे ड्रोन 10 किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकते. आणि ते 120 मीटर उंचीवरील अदृश्य "स्काय टनेल" मार्गाचा वापर करेल. अर्थातच ट्रॅफिक टाळल्याने डिलिव्हरीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होतो.
20 मीटरवरून पार्सल खाली सोडणार
गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर, ड्रोन 20 मीटर उंचीवरून "स्काय विन्च" प्रणालीद्वारे पार्सल खाली सोडतो आणि डिलिव्हरी पूर्ण झाल्यावर त्याच मार्गाने परत जातो. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ 7 मिनिटांत पूर्ण होते.
स्काय एअरच्या ग्राहकांमध्ये ब्लू डार्ट, DTDC, शिपरॉकेट आणि ईकॉम एक्सप्रेस यांचा समावेश आहे. सध्या कंपनी ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स शिपमेंट हाताळते, तसेच लवकरच फूड डिलिव्हरी सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.
स्काय एअरचे संस्थापक आणि CEO अंकित कुमार म्हणाले, "ड्रोन डिलिव्हरी तंत्रज्ञान केवळ वेग वाढीसाठी नाही, तर ते शाश्वत आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्स इकोसिस्टम निर्माण करण्यासाठी आहे.
बंगळुरूमध्ये आमचा विस्तार म्हणजे पर्यावरणपूरक आणि जलद वितरणाच्या वाढत्या मागणीचा पुरावा आहे, जो व्यवसाय आणि ग्राहक दोघांसाठी फायद्याचा ठरेल. प्रत्येक ड्रोन उड्डाणासह आम्ही केवळ कार्यक्षमता वाढवत नाही तर लॉजिस्टिक्सच्या हरित आणि स्मार्ट भविष्यासाठी मार्ग मोकळा करत आहोत."
सध्या, प्रत्येक ड्रोन डिलिव्हरीमुळे 520 ग्रॅम कार्बन उत्सर्जन वाचते. जो रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूक आणि पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने शाश्वत उपाय आहे.
उदाहरणार्थ, प्रत्येक महिन्याला 5000 ड्रोन डिलिव्हरीमुळे एका रस्त्यावर कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जनात 2.6 मेट्रिक टनाची घट होते. तर वर्षभरात हे प्रमाण 31 मेट्रिक टनांपर्यंत जाते.
जर हे तंत्रज्ञान 100 पेक्षा जास्त मार्गांवर लागू केले तर दरवर्षी 3100 मेट्रिक टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन घटेल. जे एकप्रकारे 1.5 लाख झाडे लावण्याइतके परिणामकारक असेल.
सुरक्षा आणि तांत्रिक वैशिष्ट्ये
सुरक्षितता: या ड्रोनमध्ये पॅराशूट आहे. तांत्रिक बिघाडावेळी त्यामुळे अतिरिक्त संरक्षण मिळते
स्मार्ट कनेक्टिव्हिटी: 5G मॉड्यूल असल्यामुळे ड्रोनच्या हालचाली, ट्रॅकिंग आणि संवाद अधिक प्रभावी होतो.
डेटा ट्रॅकिंग : स्काय UTM ब्लॅक बॉक्स प्रणालीद्वारे प्रत्येक फ्लाईटचे डेटा लॉगिंग होते. ज्यामध्ये उड्डाणाची कार्यक्षमता, यंत्रणेचे निदान आणि पर्यावरणीय परिस्थिती यांचा समावेश आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये स्थापन झाल्यापासून स्काय एअर ही कंपनी आरोग्य, ई-कॉमर्स आणि तातडीच्या डिलिव्हरी सेवांमध्ये मोठे योगदान देत आहे. कंपनीने गतवर्षी देशभरात 10 सरकारी वैद्यकीय औषध डिलिव्हरीचे प्रोजेक्ट स्विकारले.
ज्यामध्ये AIIMS राजकोट, AIIMS भुवनेश्वर आणि तामिळनाडूतील केंद्रीय कुष्ठरोग संशोधन संस्था (CLTRI) यांचा समावेश आहे.
तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये औषधांची डिलिव्हरी
"मेडिसिन फ्रॉम द स्काय" प्रकल्पांतर्गत तेलंगणा सरकारसोबत कंपनीने भागीदारी करून औषधांची यशस्वी ड्रोन डिलिव्हरी प्रायोगिक तत्त्वावर पार पाडली आहे.
पश्चिम बंगालमध्ये 104 किमी हवाई मार्गाने Flipkart हेल्थ प्लस च्या औषधांची डिलिव्हरी करण्यात आली. ही भारतातील सर्वाधिक लांबीची ड्रोन डिलिव्हरी ठरली आहे.
4 तासांचे अंतर केवळ 45 मिनिटांत कापले
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात कंपनीने "BVLOS" (Beyond Visual Line of Sight) ट्रायल्स यशस्वीपणे पार पडल्या, ज्यामध्ये 170 किमीचे अंतर कापण्यात आले. मेघालयमध्ये एका उपक्रमांतर्गत 100 किलो हळद ड्रोनद्वारे वाहून नेण्यात आली.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ड्रोन डिलिव्हरी अत्यंत प्रभावी ठरत आहे. उदाहरणार्थ, हिमाचल प्रदेशातील मंडी ते हमीरपूर हे अंतर रस्त्याने कापायचे झाल्यास 2 तास लागतात तर ड्रोनने हे फक्त 30 मिनिटांत पार केले. तसेच, चंदीगड ते शिमला हे 4 तासांचे अंतर केवळ 45 मिनिटांत पूर्ण केले.
स्काय एअर ई-कॉमर्स क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी विविध कंपन्यांसोबत भागीदारी करत आहे. यामध्ये शिपरॉकेट आणि श्री मारुती इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स (SMILe) सारख्या ई-कॉमर्स सक्षमता प्लॅटफॉर्म्ससोबत करार केला आहे.
कंपनीचे CEO अंकित कुमार म्हणाले, "ड्रोन तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या डिलिव्हरी खर्चात जवळपास 50 टक्के कपात होऊ शकते. यामुळे केवळ मोठ्या शहरांतच नाही तर लहान गावांमध्येही जलद आणि परवडणाऱ्या डिलिव्हरी सेवा उपलब्ध होतील."
डिलिव्हरी सेवेतील भविष्य...
बंगळुरूमध्ये 7 मिनिटांत ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू करून स्काय एअरने लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे. यामुळे ई-कॉमर्स, वैद्यकीय क्षेत्र, ग्रामीण आरोग्य सेवा आणि तातडीच्या डिलिव्हरी सेवांसाठी नवा मार्ग खुला झाला आहे.
ड्रोन डिलिव्हरी हे भविष्यातील लॉजिस्टिक्सचे नवे स्वरूप बनणार आहे. यात गती, शाश्वतता आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य असेल.