अनिल साक्षी
जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानलगत असलेल्या लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (इंटरनॅशनल बॉर्डर) पाकिस्तानी ड्रोन्सच्या हालचाली वाढल्याने सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. ड्रोनद्वारे सामान टाकणे, तस्करी तसेच हेरगिरीच्या शक्यतेमुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे. एलओसीजवळ 6 पाकिस्तानी ड्रोन आढळून आले. भारतीय सैन्याने गोळीबार, तसेच इतर यंत्रणा सक्रिय करून ड्रोन्सना पुन्हा पाकिस्तानी सीमेत पिटाळले.
रविवारी रात्री उशिरा राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर येथे एलओसीजवळ एक संशयित पाकिस्तानी ड्रोन आढळून आला. भारतीय सेनेने तत्काळ गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. लष्करी सूत्रांनुसार, ड्रोनची हवाई घुसखोरी ओळखताच काऊंटर-अनमँड एरियल सिस्टीम सक्रिय करण्यात आली, ज्यामुळे तो ड्रोन एलओसीपलीकडे परत जाण्यास भाग पाडण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.
संरक्षण सूत्रांनी पुढे माहिती दिली की, जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीजवळ एकूण सहा ड्रोन दिसल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानी लष्कराशी संबंधित ड्रोनद्वारे संवेदनशील सीमावर्ती भागात हेरगिरी किंवा टेहळणी करण्याचे प्रयत्न असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सध्याच्या सुट्ट्यांच्या काळात घुसखोरी किंवा शस्त्रसंधीचे उल्लंघन होऊ नये यासाठी हा वाढीव बंदोबस्त करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरमधील गुरेज, उरी, करनाह, तंगधार हे संवेदनशील भाग तसेच जम्मू विभागातील प्रमुख सेक्टर येथे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. सीमेपलीकडून होणार्या तस्करीशी संबंधित अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर ही वाढीव तैनात करण्यात आली असून, सीमावर्ती सुरक्षेला अधिक बळकटी देण्यावर प्रशासनाचा भर असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले.
अधिकार्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांनी एलओसी व आंतरराष्ट्रीय सीमेवर पाळत मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सीमेपलीकडून होणार्या संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी ड्रोनविरोधी यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) चे जवान डिजिटल सर्व्हिलन्स, ड्रोन मॉनिटरिंग आणि 24 तास गस्त घालत आहेत. अधिकार्यांनी स्पष्ट केले की, जवानांना कमकुवत ठिकाणांवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आणि कोणत्याही सुरक्षा आव्हानाला तत्काळ प्रतिसाद देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.