गुवाहाटी; वृत्तसंस्था : प्रसिद्ध पार्श्वगायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यूमागे रहस्य वाढत चालले आहे. आता झुबिन गर्ग यांच्या मृत्यूचा अंतिम शवविच्छेदन अहवाल व विषप्रभाव चाचणी अहवाल सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सीआयडी’चे विशेष डीजीपी मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी ही माहिती दिली.
गुप्तांनी सांगितले की, ‘आम्ही अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक करणार आहोत, ही चुकीची माहिती आहे. मात्र, आम्ही काही प्रतिष्ठित नागरिकांना मंगळवारी दुपारी 4 वाजता आमंत्रित केले आहे. त्यांच्यासमवेत आम्ही या प्रकरणातील अद्ययावत माहिती शेअर करू.
19 सप्टेंबर रोजी झुबिन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये समुद्रात पोहत असताना मृत्यू झाला. ते ‘नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिव्हल’च्या चौथ्या पर्वासाठी सिंगापूरला गेले होते. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण आसाममध्ये शोककळा पसरली होती. पहिल्यांदा पोस्टमॉर्टम सिंगापूरमध्ये झाले. त्यानंतर 23 सप्टेंबर रोजी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दुसर्यांदा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर विसेरा नमुना दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. या संशयास्पद मृत्यूमुळे आसाममध्ये संतापाची लाट उसळली होती. विविध पोलिस ठाण्यांमध्ये 60 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यानंतर अंतर्गत एक विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपास सुरू केला आहे.
झुबिन गर्ग यांच्या एका बँडमेटने दावा केला आहे की, गर्ग यांना विष देण्यात आले होते. त्यामुळे प्रकरणात आणखी गूढ वाढले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी सांगितले की, ‘विसेरा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तपासाला निश्चित दिशा मिळाली आहे. प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे.’