नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष मतदार यादी सुधारणा (एसआयआर) मोहिम राबवण्याची घोषणा केली आहे. या प्रक्रियेला २० मे २०२६ पासून सुरुवात होणार असून महाराष्ट्रात ही मोहीम २० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान नव्या मतदारांची नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच मतदारांच्या तपशीलातील दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
दरम्यान, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड यांसारख्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका होणार असून त्याच पार्श्वभूमीवर एसआयआरप्रक्रिया अधिक महत्त्वाची ठरणार आहे.देशभरात १९ ठिकाणी होत असलेल्या एसआयआरची सुरुवात २० मे २०१६ रोजी होईल. विविध राज्यांचे स्वतंत्र वेळापत्रक आहे. १९ पैकी शेवटच्या राज्याची प्रक्रिया २३ डिसेंबर रोजी पूर्ण होईल.
या विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दावे आणि हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडेल. सर्व सुनावण्या आणि पडताळणीनंतर महाराष्ट्रात ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी देशातील विविध टप्प्यांमध्ये एसआयआर मोहीम राबवली होती. या मोहिमेद्वारे मतदार याद्यांमधील डुप्लिकेट, मृत अथवा अपात्र मतदारांची नावे कमी करण्यावर भर देण्यात आला होता. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी आपली नावे, पत्ता आणि अन्य माहिती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
ही प्रक्रिया महाराष्ट्रसह ओडिशा, मिझोरम, सिक्कीम, मनिपुर, दादरा नगर हवेली आणि दिव दमण, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, मेघालय, झारखंड, दिल्ली, नागालँड, त्रिपुरा अशा १६ राज्यांमध्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एसआयआरचा हा तिसरा टप्पा असून एसआयआर देशभर टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. या प्रक्रियेत जनगणनेच्या सध्या सुरू असलेल्या ‘घर-यादी’ प्रक्रियेतील यंत्रणा आणि फील्ड मशीनरीचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा या टप्प्यात समावेश नाही. या टप्प्यात सुमारे ३.९४ लाख बूथ लेव्हल अधिकारी आणि ३.४२ लाख बूथ लेव्हल एजंट्स सहभागी होणार आहेत. सुमारे ३६.७३ कोटी मतदारांच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यापूर्वीच्या दोन टप्प्यांमध्ये ५९ कोटी मतदारांचे पुनरीक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
तयारी, प्रशिक्षण आणि छपाई : २० जून २०२६ ते २९ जून २०२६
बीएलओंकडून घरभेटी : ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६
मतदान केंद्रांचे तर्कसंगतीकरण : २९ जुलै २०२६ पर्यंत
मसुदा मतदार यादी प्रकाशन : ५ ऑगस्ट २०२६
दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी : ५ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६
दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : ५ ऑगस्ट २०२६ ते ३ ऑक्टोबर २०२६
एसआयआरसाठी पात्रता दिनांक : १ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रकाशन : ७ ऑक्टोबर २०२६