नवी दिल्ली : सणासुदीच्या तोंडावर चांदीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून, दरवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी चेन्नईच्या बाजारात चांदीने प्रतिकिलो दोन लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला.
सणासुदीची वाढती मागणी आणि मौल्यवान धातूंना जागतिक बाजारात मिळालेल्या तेजीमुळे चांदीच्या दरात ही मोठी वाढ दिसून येत आहे. गुड रिटर्न्स या संकेतस्थळाने दिलेल्या आकडेवारीनुसार, चेन्नईच्या बाजारात गुरुवारी चांदीचा भाव प्रतिकिलो 2,06,000 रुपयांवर पोहोचला. या महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दरात तब्बल 45,000 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळी जवळ आल्याने सोन्याचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक चांदीची नाणी, भांडी आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या खरेदीकडे वळले आहेत, असे चेन्नईतील सराफांनी सांगितले.