silent layoffs tech industry
आयटी उद्योगात नोकरकपात. file photo
राष्ट्रीय

सायलेंट लेऑफचा फटका! २०२४ मध्ये ९८ हजार IT कर्मचाऱ्यांना नारळ

पुढारी वृत्तसेवा

टेक उद्योगात २०२४ मध्येही नोकरकपात सुरूच आहे. मुख्यतः गंभीर बाब म्हणजे IT उद्योगात आता सायलेंट लेऑफचा (silent layoffs) ट्रेंड सुरु असून याचा फटका अनेक कर्मचाऱ्यांना बसत आहे. २०२४ मध्ये ९८ हजार आयटी कर्मचाऱ्यांनी आधीच नोकऱ्या गमावल्या आहेत. आता त्यांना सायलेंट लेऑफचा सामना करावा लागत आहे.

२०२२ मध्ये टेक उद्योगात मोठ्या प्रमाणात नोकरकपात दिसून आली. ॲमेझॉन, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा सारख्या मोठ्या कंपन्यांनी हजारो नोकऱ्या कमी केल्या. Layoff.ly च्या माहितीनुसार, २०२३ या वर्षात नोकरकपातीचा ट्रेंड अधिक तीव्र दिसून आला होता. २०२३ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत नोकरकपातीत ५९ टक्के वाढ नोंदवली. या वर्षात एकूण २,६२,९१५ कर्मचाऱ्यांना विविध कंपन्यांमधून काढून टाकले गेले. आर्थिक मंदी, कोरोना काळात करण्यात आलेली अधिक भरती आणि आर्थिक समतोल राखण्याच्या उद्देशाने केलेली धोरणात्मक पुनर्रचना आदी नोकरकपातीमागील कारणे आहेत. टेक उद्योगात गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु असूनही, या क्षेत्रात २०२४ मध्ये नोकरकपात थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

९८ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ९८,८३४ कर्मचाऱ्यांना ३३७ टेक कंपन्यांनी आधीच काढून टाकले आहे. कंपन्या खर्च कमी करण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहेत. परिणामी आणखी नोकऱ्या कमी होतील. नोकरी जाण्याची भीती आयटी कर्मचाऱ्यांना असताना आता एक नवीन सायलेंट लेऑफचा ट्रेंड वाढत आहे.

२०२३ मध्ये सुमारे २० हजार टेक कर्मचाऱ्यांना फटका

मनीकंट्रोलच्या एका वृत्तानुसार, भारतीय IT आणि ITeS क्षेत्र अधिकाधिक या पद्धतीचा अवलंब करत आहे, ज्यामध्ये कोणताही माहिती सार्वजनिक न करता कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी दबाव आणला जातो. अखिल भारतीय IT आणि ITeS कर्मचारी संघटनेने (AIITEU) दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये सुमारे २० हजार टेक कर्मचाऱ्यांना या अघोषित नोकरकपातीचा फटका बसला होता. वास्तविक ही संख्या याहूनही जास्त असल्याची शक्यता आहे.

सायलेंट लेऑफ म्हणजे काय?

सायलेंट लेऑफमध्ये अनेकदा कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये नवीन संधी शोधण्यासाठी ३० दिवसांचा वेळ दिला जातो. कर्मचारी कंपनीतच नवीन काम न मिळवण्यास अयशस्वी झाल्यास त्याला काढून टाकले जाते. AIITEU च्या माहितीनुसार, कंपन्यांकडून सायलेंट लेऑफचा सर्रास वापर केला जात आहे. यामुळे कोणताही गाजावाजा करता आणि संभाव्य परिणाम टाळून नोकरकपात केली जात आहे.

कार्यमुक्तीचे पत्र 'टर्मिनेटेड' म्हणून मिळाले की....

नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) च्या आणखी एका अहवालानुसार, २०२४ च्या पहिल्या ५ महिन्यांत आघाडीच्या भारतीय IT सेवा कंपन्यांतून सुमारे २ हजार आणि ३ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. "कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे अनेक मार्ग शोधत आहेत आणि जे विरोध करतात त्यांना (तात्काळ) काढून टाकले जाते. एकदा का कार्यमुक्तीचे पत्र 'टर्मिनेटेड' म्हणून मिळाले की त्या व्यक्तीला दुसरी नोकरी शोधणे खूप कठीण होते," NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांना मनी कंट्रोलशी बोलताना म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT