राष्ट्रीय

CM big Announcement : महिलांच्या खात्यात दरमहा ३,००० रुपये जमा होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अवघ्या ५ रुपयांत मिळणार भात-माशाचे जेवण...

पुढारी वृत्तसेवा

cm shubhendu adhikari announcement 3000 rupees per month for women

कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी राज्यातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी घोषणांचा धडाका लावला आहे. शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात दारूची दुकाने सुरू करण्यास सक्त मनाई असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. याशिवाय, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'अन्नपूर्णा योजना' कार्यान्वित करण्यात येत असून, त्याअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ३,००० रुपयांची थेट मदत जमा केली जाणार आहे.

नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे आयोजित एका प्रशासकीय बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री अधिकारी यांनी या योजनेची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, २७ मे पासून राज्य सचिवालयामार्फत अन्नपूर्णा योजनेसाठीचे अर्ज उपलब्ध करून दिले जातील. या योजनेचा लाभ घेण्यास सर्व भारतीय नागरिक पात्र असतील आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित महिलांच्या खात्यात ३,००० रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यास सुरुवात होईल.

अन्नसुरक्षेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत, राज्य सरकारने राज्यातील सुमारे ४०० विशेष कॅन्टीन्समध्ये आठवड्यातून दोनदा अवघ्या ५ रुपयांत 'मासे आणि भात' असा पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र 'आयुष विभाग' स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दुसरीकडे, प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि थेट जनसंवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी 'जनता दरबार' उपक्रम सुरू केला आहे. सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या जनता दरबारात नोकरी इच्छुक तरुण, शिक्षक, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सॉल्ट लेक येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पहाटेपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नोकरीच्या आशेने आलेल्या तरुणांच्या हातात फाईल्स तर ज्येष्ठ नागरिकांच्या हातात तक्रारींचे कागदपत्रे होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आणि समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संघटनांचे प्रतिनिधी, नर्स आणि पोलीस भरतीसाठी इच्छुक महिलांनी या दरबारामध्ये गर्दी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचताच समर्थकांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम' आणि 'जय श्री राम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. ९ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अधिकारी यांनी सुरू केलेल्या या जनसंपर्क मोहिमेला आणि जनता दरबाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT