नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असून, त्यांच्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी शेतकर्यांना अभिमान वाटावी अशी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. शुभांशू यांनी मेथी आणि मूग या बियांना अंकुर फुटतानाचे फोटो घेतले असून, या बिया सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात कशाप्रकारे उगम पावतात याच्या अभ्यासासाठी त्या स्टोअरेजसाठी फ्रीझरमध्ये ठेवल्या आहेत.
धारवाड कृषी विद्यापीठातील वैज्ञानिकांचा प्रयोग ही अभ्यास मोहीम भारतातील दोन प्रमुख संशोधन संस्थांमधील सहकार्याचा भाग आहे. कर्नाटकातील कृषी विद्यापीठ येथील प्रा. रविकुमार होसामानी आणि आयआयटी धारवाड येथील डॉ. सुधीर सिद्धापुरेड्डी हे या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये बियांची उगम प्रक्रिया, सुरुवातीची वाढ, आनुवंशिक बदल, सूक्ष्मजैविक संवाद आणि पौष्टिक मूल्य यावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
सूक्ष्म शैवाळावरही संशोधन बियांच्या प्रयोगांशिवाय शुक्ला सूक्ष्म शैवाळावरही काम करत आहेत.अन्न, प्राणवायू आणि जैवइंधन निर्माण करण्यासाठी सूक्ष्म शैवाळाचा वापर होऊ शकतो. अंतराळातील दीर्घकालीन मोहिमांसाठी मानव जीवन टिकवण्यासाठी हे सूक्ष्मजीव महत्त्वाचे ठरू शकतात. शुक्ला एका अन्य प्रयोगात सहा प्रकारच्या पिकांच्या बियांवरही काम करत आहेत, ज्या अनेक पिढ्यांपर्यंत वाढवल्या जाणार आहेत.
माझ्याकडून स्टेम सेल संशोधन, बियांवरील प्रभाव, अंतराळात स्क्रीनशी संवाद साधताना होणारा मेंदूवरचा ताण यांचा अभ्यास केला जात आहे. हे सगळे अत्यंत रोचक आहे. संशोधक आणि अंतराळ स्थानक यामधील एक दुवा झाल्याचा मला खूप अभिमान आहे, असे शुक्ला यांनी अॅक्सिओम स्पेसच्या मुख्य शास्त्रज्ञ लुसी लो यांच्याशी संवाद साधताना सांगितले.
शुक्ला म्हणाले, माझ्यासाठी एक अत्यंत रोमांचक प्रकल्प म्हणजे स्टेम सेल संशोधन. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात स्टेम सेलमध्ये पूरक घटक जोडून जखम भरून काढणे, वाढ किंवा पुनरुत्पादन जलद करता येईल का, याचा शोध घेणारे संशोधन मी ‘ग्लोव्ह बॉक्स’मध्ये करत आहे. हे काम करताना खूपच उत्साह वाटतो आहे.